तांब्याच्या तारा बदलताना झाली चूक आणि अमेरिकेतील विमान वाहतूक पडली बंद, हवाई आणीबाणीमागील कारण आले समोर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेमध्ये शुक्रवारी मोठी हवाई आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. दोन दिवसांमध्ये 15 हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करावी लागली होती. एअर ट्रफिक कंट्रोलच्या संपर्क यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामागील कारण शोधण्यात यश आले असून तांब्याच्या तारा बदलताना संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याचे लक्षात आले आहे. या त्रुटीबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.

संपर्क यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे दोन दिवसांमध्ये अमेरिकेतील विमान वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. 15 ते 20 लाख प्रवाशांना याचा फटका बसला आहे. यासंदर्भात अमेरिकेचे परिवहन मंत्री सीन डफी यांनी सांगितले की, एअर ट्रफिक कंट्रोल यंत्रणा सुधारण्यासाठी जुन्या तांब्याच्या तारांना बदलून ही यंत्रणा फायबर केबल्सद्वारे बदलण्यात येत आहे. हे काम सुरू असतना एक नवीन राऊटर बदलताना चूक झाली आणि संपूर्ण संपर्क यंत्रणा ठप्प झाली. राऊटर खराब होता की तो बदलताना चूक झाली, याचा तपास करण्यात येत आहे. या घटनेमागे सायबर हल्ल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असेही डफी यांनी स्पष्ट केले.

हवाई वाहतूक अजूनही विस्कळीतच

अमेरिकेतील हवाई वाहतूक प्राधिकरणाचे प्रमुख ब्रायन बेडफोर्ड यांनी सांगितले की, यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. हवाई वाहतूक सुरू झाली आहे, मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. विमान कंपन्यांना समस्या येत आहेत. अनेक वैमानिक त्यांच्या निश्चित ठिकाणांवर पोहोचलेले नाहीत. यामुळे विलंब होत आहे. एअर ट्रफिक यंत्रणा सुधारण्यासाठी बेडफोर्ड यांनी 50 अब्ज डॉलर एवढा निधी मागितला आहे.

Comments are closed.