धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले

पुणे : शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीही गेल्या काही वर्षात चांगलीच वाढली आहे. हत्या, कोयता गँग, महिलांवरी अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्याच आठवड्यात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे जिल्ह्याला भेट देऊन पोलिसांसोबत चर्चा केली. गुन्हेगारांवर वचक बसवण्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आला. मात्र, पुण्यातील प्रसिद्ध एमआयडीसी मानली जाणाऱ्या चाकण एमआयडीसी परिसरात चक्क गोळीबाराची घटना घडली आहे. स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत गोळीबाराची घटना घडली असून येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागलेली आहे. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन् त्यांनी कंपनीच्या गेटवरुनच कंपनीच्या मालकांवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले आहेत.

चाकण एमआयडीसी परिसरात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून कंपनी मालक अजय सिंग यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यामागचं कारण हल्लेखोरांना बेड्या ठोकल्यानंतर समोर येईल. मात्र, या हल्ल्याच्या घटनेमुळे कंपनी परिसरात व चाकण एमआयडीसीत खळबळ उडाली आहे.

आरोपींच्या शोधासाठी 10 पथके तैनात

खंडणीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, जखमी असलेल्या कंपनी मालकांनीही तशी मागणी कोणाकडूनही झाली नसल्याचे म्हटले. अजय सिंग यांच्यावर सकाळी पावणे अकरा-अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी असून दोघांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस व गु्न्हे शाखेचे 10 ते 12 पथक कार्यरत झाले आहेत. कंपनीचे मालक प्रत्यक्ष जखमी, व कंपनीतील इतरांशी आम्ही चौकशी केली असून हा हल्ला खंडणी किंवा व्यवसायातून झालेला नाही असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे, याप्रकरणात हल्लेखोराचा नेमका हेतू काय, याचा तपास आम्ही करत असल्याचे पिंपरी चिंचवडचे डीसीपी डॉ. शिवाजी पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.

हेही वाचा

जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी

अधिक पाहा..

Comments are closed.