पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 20 जूनला निकाल, पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवरुन कोर्ट

पवनराजे निंबाळकर प्रकरण: राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज, 16 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) लागणे अपेक्षित होते. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला आहे. आता या ऐतिहासिक आणि संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल 20 जून 2026 रोजी येण्याची दाट शक्यता आहे. तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Pawanraje Nimbalkar Case:  पद्मसिंह पाटील अ‍ॅम्ब्युलन्सने कोर्टात दाखल

आज सकाळी 11 वाजता मुंबई सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, जयराजे निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांच्यासह पवनराजेंचे चालक दिवंगत समद काझी यांची पत्नी आणि मुलगा न्यायालयात हजर होते. दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil) हे तब्येत ठीक नसल्यामुळे थेट अ‍ॅम्ब्युलन्सने (Ambulance) न्यायालय आवारात दाखल झाले होते. न्यायाधीशांनी कोर्टाची कार्यवाही सुरू करताच सर्व आरोपींची हजेरी (Attendance) घेण्यास सुरुवात केली. मात्र, निकालाचे वाचन करायला वेळ लागणार असल्याने निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा निकाल 20 जून रोजी लागणार आहे.

Omraje Nimbalkar: 20 वर्षे 13 दिवसांचा संघर्ष, न्यायाची अपेक्षा: ओमराजे निंबाळकर

निकालाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची. माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा. हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे..! आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लाऊन न्यायाची अपेक्षा करत आहेत. न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली होती.

Pawanraje Nimbalkar Case:  धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडात माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आरोपी असल्याने धाराशिव जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव पोलीस सतर्क झाले आहे. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडून सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या आणि चोख बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावरील अफवा रोखण्यासाठी सायबर पोलीसही कार्यरत आहेत. आता संपूर्ण राज्याचे लक्ष 20 जूनच्या निकालाकडे लागले आहे.

कोण आहेत पद्मसिंह पाटील? (Who is Padamsinh Patil?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जाणारे पद्मसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी मानले जातात. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. उस्मानाबाद मतदारसंघातून ते तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये गृह, सिंचन आणि ऊर्जा मंत्री म्हणून कॅबिनेट पद भूषवले आहे.

मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर अनेक वादांचे सावटही राहिले. 2006 मध्ये काँग्रेसचे नेते आणि त्यांचे चुलतभाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. निंबाळकर हे उस्मानाबादमधील त्यांच्या राजकीय आणि सहकारी संस्थांच्या कामकाजात सक्रिय होते. याआधी 2005 मध्ये भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उघड केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळेही पद्मसिंह पाटील चर्चेत आले होते. पी. बी. सावंत समितीने त्यांच्यावर कारगिल युद्ध आणि गुजरात भूकंपग्रस्तांसाठी असलेल्या तेरणा साखर सहकारी संस्थेच्या निधीतील गैरव्यवहार आणि शेतकऱ्यांचा पैसा अपहार केल्याचे आरोप ठेवले होते.

नेमकं प्रकरण काय? (What is Pawanraje Nimbalkar Case)

दरम्यान, 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.

Comments are closed.