एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटलं; अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश
नाशिक : नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे, पीडिताला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची भीती दाखवून तो त्यांच्याकडून लाखो रुपये स्वीकारत असे. इतकंच नाही तर त्याने मिरगाव येथील १५ ते २० लाखांची जमीन अशाच प्रकारे कवडीमोल भावामध्ये नावावर करून घेतल्याची चर्चा आहे.(Ashok Kharat)
एसआयटीच्या तपासात अशोक खरातकडून (Ashok Kharat) होत असलेल्या फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत असून त्यामुळे अधिकारी देखील चक्रावले आहेत. मिरगाव (ता. सिन्नर) येथील एका कुटुंबाची १६ लाखांची जमीन अत्यंत कमी किमतीमध्ये घेण्यासाठी खरातने संबंधित कुटुंबाकडे तगादा लावला होता. अशोक खरातने (Ashok Kharat) कुटुंबाला भीती घातली, तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात कुटुंबात वाईट पटना पडेल, अशी भीती घातली. याच दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू देखील झाला. याचा गैरफायदा घेत खरातने, जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती दाखवत त्याला हवी असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करून घेतली. याच जमिनीवर अशोक खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याची बाब समोर आली आहे.(Ashok Kharat)
जमीन व्यवहारप्रकरणी दोघा डॉक्टरांची चौकशी
जमिनीच्या अनेक व्यवहारांमध्ये अशोक खरातसोबत असणाऱ्या शहरातील दोन डॉक्टरांची एसआयटी पथकाने चौकशी केल्याची माहिती एका मराठी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. यात एका डॉक्टरचे राजकीय कनेक्शन सांगितले जात आहे. दोन ते तीन जमिनीच्या व्यवहारात हे डॉक्टर सोबत होते अशी माहिती आहे. नाशिक शहराला लागून असलेल्या जमिनीच्या व्यवहारप्रकरणी चौकशी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रारंभी भोंदू खरातला गुंगीचे औषध विक्री केल्याप्रकरणी या डॉक्टरांची चौकशी झाल्याची देखील माहिती आहे.
अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा
दरम्यान, भोंदूगिरी प्रकरणात अडकलेल्या अशोक खरात याच्याविरोधात आता आणखी एक गंभीर गोरखधंदा उघडकीस येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. बनावट ‘फार्मर प्रोड्यूसर कंपन्या’ स्थापन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या NAFED (नाफेड) मार्फत शेतमाल खरेदी प्रक्रियेचा गैरफायदा घेत, खरातने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित संबंधांचा वापर करून या कंपन्या उभ्या केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या प्रकरणात ‘व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ विशेष चर्चेत आली आहे. या कंपनीमध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नी संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी 15 ते 16 कंपन्यांमध्ये खरातची भागीदारी असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांकडून कांदा, मका यांसारख्या पिकांची खरेदी करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे.
या संदर्भात निलेश शेडगे (श्रीरामपूर, स्वतंत्र भारत पक्ष) यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणात खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. एकूणच, आधीच गंभीर असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता शेतकरी फसवणुकीचा नवा कोन समोर आल्याने तपास अधिकच गडद होत असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.