विधानसभेला झाला पराभव..आता अजित पवार पुन्हा आमदार करणार? राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा विरोध

विद्रन परिषद निवडणूक: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 27 मार्चला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. यात भाजपच्या तीन राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक आणि शिंदे गटाच्या एका आमदारासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी अजित पवार गटाच्या एका जागेसाठी 100हून अधिक इच्छूकांचे अर्ज आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या झीशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांचं नाव आघाडीवर आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची झीशान सिद्दकींच्या नावाला प्रचंड विरोध होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची डोकेदुखी वाढणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचा मुलगा आणि मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष झीशान सिद्दिकी यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये अजित पवार गटात दाखल झाले. महाराष्ट्र विधानसभेसाठी वांद्रे पूर्वमधून त्यांना पक्षाचे उमेदवारीची संधी पक्षाने दिली होती. आता विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी झीशान सिद्दीकींना पक्षातील वरिष्ठांचा विरोध डावलून पक्ष सिद्दीकींना संधी देणार का? याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष आहे.

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी इच्छूकांची भाऊगर्दी

विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणूकीत अजित पवार गटाच्या एका जागेसाठी इच्छूकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र आहे. 17 मार्चला निवडणूकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत 100 हून अधिक अर्ज आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दोन विधानपरिषदेच्या जागा आहेत. पैकी एक जागा राज्यपालांच्या नियुक्त कोट्यातून पक्षाला मिळणार आहे तर दुसरी विधानपरिषदेच्या आमदारांमधून निवडून येणारी आहे. पक्षांतर्गत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी बाबा सिद्दिकींचा मुलगा, झीशान सिद्दिकी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेऊन उमेदवारी देण्याची अनेक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. तर काहींनी विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी कशासाठी? अशी भूमिका घेतलीय. झिशान सिद्दिकींकडून मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिक्त जागांसाठी निवडणूक

विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या असून या पाच जागांसाठी आता 27 मार्चला निवडणूक होणार आहे.

हेही वाचा:

Vidhan Parishad Election 2025 : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी, 100 हून अधिक अर्ज, एका नावाची जोरदार चर्चा, पण…

अधिक पाहा..

Comments are closed.