6 Terrorist Arrest आणखी सहा संशयितांना दिल्ली-पंजाबमधून अटक ‘पेट्रोल बॉम्ब’ हल्ल्याचा कट उधळला, आयएसआय’च्या सांगण्यावरून स्फोटांचे नियोजन

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. एका मोठ्या दहशतवादविरोधी कारवाईत दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली आणि पंजाबमधून आणखी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले सर्व आरोपी पाकिस्तानी गँगस्टर्सचे एक मॉड्यूल, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि गँगस्टर्स शहजाद भट्टी याच्याशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडून ‘आयएसआय’च्या निर्देशानुसार देशात वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल बॉम्बद्वारे हल्ल्याचे नियोजन केले जात होते. मात्र, तत्पूर्वीच संशयितांना अटक झाल्याने हल्ल्याचा एक मोठा कट फसला आहे.
पंजाब आणि दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईच्या माध्यमातून पोलिसांच्या विशेष पथकाने या नेटवर्कचे दोन वेगवेगळे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एक मॉड्यूल दहशतवादी कारवायांमध्ये, तर दुसरे अवैध शस्त्र तस्करीमध्ये सामील होते. अटक केलेल्या आरोपींकडून अनेक पिस्तूल आणि पेट्रोल बॉम्बही जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, या मॉड्यूलचे सदस्य देशात गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होते.

आरोपींचा कसून तपास
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आता अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहे. अटकेतील आरोपींकडून नेटवर्कबद्दलची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच निधी पुरवठा कोण करतो, शस्त्रास्त्रांची पुरवठा साखळी आणि संभाव्य कटांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मॉड्यूलमध्ये आणखी किती लोक सामील आहेत आणि त्यांचे लक्ष्य कोण होते, याचाही तपास सुरू आहे. तपास सुरू असून तपासाच्या आधारे आणखी अटक केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

दहशतवादाविरोधात सातत्यपूर्ण कारवाई
यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी एका आंतरराज्यीय कारवाईत चार आरोपींना अटक केली होती. हे आरोपी आयएसआयचा हँडलर शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांच्या सांगण्यावरून दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होते. पकडले जाऊ नये म्हणून हे संशयित आरोपी त्यांच्या पाकिस्तानी हँडलर्सनी दिलेल्या परदेशी क्रमांकांचा वापर करत होते. त्यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पंजाबचे रहिवासी असलेल्या आरोपींची ओळख शुभदीप सिंग उर्फ विशाल (23), गुरजंत सिंग उर्फ ऋषी, साजन सिंग उर्फ हनी (28) आणि गगनप्रीत (24) अशी पटली आहे. त्यांच्या ताब्यातून एक झिगाना पिस्तूल आणि एक पॉईंट30-बोर पिस्तूल, नऊ काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

Comments are closed.