श्रीलंकाविरुद्धच्या मोठा सामन्यात ट्विस्ट, पहिल्या डावातले हिरो दुसऱ्या डावात झिरो; देवदत्त पडि

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ पहिला कसोटी सामना: श्रीलंका ए विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंडिया ए संघाने आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या डावातील मोठ्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात देवदत्त पडिक्कलने शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, दुसऱ्या डावात कर्णधार ध्रुव जुरेल आणि ऋतुराज गायकवाड यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

दुसऱ्या डावात देवदत्त पडिक्कलची झुंजार खेळी

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंडिया ए संघाकडून देवदत्त पडिक्कलने अत्यंत संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने 101 चेंडूंचा सामना करताना 5 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. पहिल्या डावात झंझावाती शतक झळकावणारा सलामीवीर साई सुदर्शन मात्र दुर्दैवी ठरला, तो वैयक्तिक 7 धावांवर असताना रिटायर हर्ट होऊन मैदानातून बाहेर पडला. दुसरा सलामीवीर आयुष पांडेने डावाची चांगली सुरुवात केली, पण 38 धावांवर तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले.

कर्णधार जुरेल अन् ऋतुराज अपयशी

पहिल्या डावात नाबाद 141 धावांची अप्रतिम खेळी करणाऱ्या कर्णधार ध्रुव जुरेलला दुसऱ्या डावात चमत्कार करता आला नाही. तो 33 चेंडूत अवघ्या 14 धावा करून बाद झाला, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडनेही अत्यंत निराशा केली, तो अवघ्या 2 चेंडूंत 1 धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. लंच टाईमपर्यंत इंडिया ए संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा केल्या होत्या आणि भारताकडे एकूण 294 धावांची भक्कम आघाडी झाली होती.

पहिल्या डावात साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेलचे शतक

या सामन्याच्या पहिल्या डावात इंडिया ए संघाने दमदार फलंदाजी केली होती. साई सुदर्शनच्या 132 धावा आणि ध्रुव जुरेलच्या नाबाद 141 धावांच्या जोरावर भारताने 6 बाद 452 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात श्रीलंका ए संघाचा पहिला डाव 330 धावांवर आटोपला. ज्यामुळे भारताला पहिल्या डावात 122 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली होती.

भारतीय गोलंदाजांची चमक

श्रीलंका ए संघाला स्वस्तात गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. ‘इंडिया ए’ कडून आकिब नबी दारने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर यश ठाकूर आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज आणि सारांश जैन यांना प्रत्येकी 1-1 गडी बाद करण्यात यश आले. एकूणच, हा सामना ड्रॉच्या दिशेने झुकत असला, तरी भारताचे पारडे जड आहे.

हे ही वाचा –

Women’s T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपमधून टीम बाहेर होताच 3 खेळाडूंचा राजीनामा! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कठीण अन् रडवणारा क्षण, पाहा Video

Comments are closed.