एकनाथ खडसे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर चर्चा, राजकीय संघर्षाला तिलांजाली
मुंबई: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. कारण, एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा सुरु झाली. या बैठकीवळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राज्यात 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांमध्येच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. या संघर्षाने मध्यंतरीच्या काळात खालचे टोक गाठले होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले होते. मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीतील भाजपश्रेष्ठींशी संधान बांधले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेवर प्रचंड वचक असल्याने एकनाथ खडसे यांचे भाजपमधील पुनरागमन लांबले होते. मात्र, एकनाथ खडसे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक सागर बंगल्यावर दाखल झाले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आमनेसामने चर्चा झाली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्हं दिसत आहेत.
फडणवीसांच्या भेटीबाबत एकनाथ खडसे काय म्हणाले?
मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलो होतो. माझ्या मतदारसंघातील सहकारी तत्त्वावरील सूतगिरणी त्याच्या भागभांडवलाचा विषय होता. काही मुक्ताई मंदिराचे विषय आहेत. काही इंजिनिअरिंग कॉलेजचे विषय आहेत. याबाबत चर्चा करुन मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. बाकी राजकीय विषयावर कुठलीही चर्चा झालेली नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
राज्यात 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, मोदी-शाह यांनी तुलनेने नवख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले होते. यानंतर 2016 च्या आसपास एकनाथ खडसे यांच्यावर एका जमीन व्यवहारात गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. यानंतर त्यांचे मंत्रिमंडळात आणि भाजपच्या पक्षसंघटनेत कधीच पुनरागमन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पुन्हा सामावून घेतले जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v= pyincyju2dq
आणखी वाचा
देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती: एकनाथ खडसे
अधिक पाहा..
Comments are closed.