चाळीसगावसाठी दावोसमध्ये 15 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार, हरित इंधनची निमिर्ती

दावोस येथे देवेंद्र फडणवीस : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon News) येथे शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरले जाणारे हरित इंधन तयार करणारा सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूएल (SAF) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत यासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आलाहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून अमेरिका स्थित अॅक्च्युकल एचक्यू आणि सांकला रिन्यूएबल प्रा. लि. यांच्याशी करार झाला असून, हा प्रकल्प सुमारे दोन हजार एकरांवर उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीमुळे जळगाव जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. रेल्वे, महामार्ग दळणवळणाची सुविधा, मुबलक पाणीसह ऊस, मका, कापूस, बांबू आदींचे घेतले जाणारे उत्पन्नामुळे चाळीसगावची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. दरम्यान, स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद सुरु आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis At Davos) यांच्यासोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणही (Mangesh Chavan) तेथे गेले आहेत.

Chalisgaon News : चाळीसगावसाठी हा ऐतिहासिक गुंतवणूक करार, मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

राज्यात मोठी गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दावोस येथे उद्योगजगताशी चर्चा करीत आहेत. याच दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नवा बाजार मिळावा आणि हजारो युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण हे देखील दावोस येथे उपस्थित राहून सातत्याने पाठपुरावा करत होते. वर्षभरापूर्वीच त्यांनी चाळीसगांव येथे मोठा उद्योग येणार असून त्याबाबत बोलणी अंतिम टप्प्यात असून येणारी गुंतवणूक किती मोठी असेल याचा अंदाज देखील कुणी करू शकत नाही असे सूतोवाच केले होते, अखेर आमदार चव्हाण यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवला असून, चाळीसगावसाठी हा ऐतिहासिक गुंतवणूक करार झाला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत, चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण, Actual HQ” या कंपनीचे सह-संस्थापक (Co-Founder) आणि अध्यक्ष डॉ. कार्तिक बालकृष्णन, Actual HQ कंपनीच्या Strategic Origination (रणनीतिक प्रकल्प शोध व भागीदारी) विभागाच्या प्रमुख ऑरोरा चिस्टे आदी उपस्थित होते.

Green Fuel Produced : प्रकल्पाअंतर्गत चाळीसगांव येथे 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

ACTUAL HQ व Sankla Renewables आणि SCUBE Infra यांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या सुमारे 2000 एकरांच्या Sustainable Industrial Zone चा हा प्रकल्प भाग असणार आहे. पुणे आधारित Sankla Group ला 30 वर्षांहून अधिक काळाचा औद्योगिक व बांधकाम क्षेत्रातील अनुभव असून, स्वच्छ ऊर्जा, जैवइंधन, शाश्वत औद्योगिक विकास आणि ग्रामीण रोजगार या क्षेत्रांवर कंपनीचा विशेष भर आहे.

या प्रकल्पाअंतर्गत चाळीसगांव येथे अंदाजे 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस पाचट, कापूस काड, सोयाबीन भूसा, तूर काड, बागायती अवशेष अशा कृषी अवशेषांपासून Sustainable Aviation Fuel (SAF) तयार केले जाणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

संपूर्ण प्रकल्प 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणार असून, BESS सह 24×7 वीज, 100 टक्के पाणी पुनर्वापर, EV ट्रकद्वारे वाहतूक, तसेच ESG (Environment, Social, Governance) निकषांचे पूर्ण पालन केले जाणार आहे.

Chalisgaon News : प्रकल्पासाठी चाळीसगांवच का?

मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे चाळीसगावची लॉजिस्टिक क्षमता या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या महाप्रकल्पातून थेट 3000 हून अधिक रोजगार निर्मिती होणार असून, शेतकरी, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि पुरवठा साखळीच्या माध्यमातून हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जाणार आहेत. FPO मार्फत शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी माल व कृषी अवशेष खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळणार आहे. भारत सरकारच्या SAF धोरणानुसार आणि ICAO च्या CORSIA नियमांशी सुसंगत असलेला हा प्रकल्प 2070 नेट-झिरो उत्सर्जन उद्दिष्टांच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. पारंपरिक एव्हिएशन इंधनाच्या तुलनेत SAF मुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे 80 टक्क्यांपर्यंत घट होणार आहे.

Mangesh Chavan : जागतिक उद्योग पटलावर चाळीसगावचे नाव प्रथमच, त्याचा मला अभिमान

या करारानंतर प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की “आजचा दिवस चाळीसगांव मतदारसंघासाठी ऐतिहासिक आहे, जागतिक उद्योग पटलावर चाळीसगावचे नाव प्रथमच आले असून लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा मला अभिमान आहे. मतदारसंघात काम करत असताना सिंचन, रस्ते, दळणवळण यासोबतचं नवीन उद्योग व त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती तसेच शेतकऱ्यांची उत्पन वाढ व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील होतो. गेल्या वर्षभरापासून याबाबत बोलणी व पाठपुरावा सुरू होता. आज अखेर याचा एक मोठा टप्पा पार झाला असून महाराष्ट्र सरकारने SAF प्रकल्पासाठी ACTUAL HQ आणि Sankla Renewables Pvt. Ltd. या दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे.

ही फक्त सुरुवात असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने दूर करून चाळीसगांवच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या साथीने व चाळीसगांवच्या जनतेच्या आशिर्वादाने पूर्ण करू” असा संकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.