दक्षिणेच्या राज्यकर्त्यांना इडलीचा अभिमान, पण देवेंद्र फडणवीस वडापाव, झुणका-भाकरचा द्वेष करतात

वडा पावावर देवेंद्र फडणवीस : ठाकरेंनी मराठी माणसासाठी वडापावच्या (Vadpava) गाडीशिवाय दुसरं स्वप्नच पाहिलं नाही, अशी टीका करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात आला आहे. मुंबईतले उद्योग गुजरातला पळवले जात असताना तोंडात ‘वडा-पाव’ कोंबून बसलेले देवेंद्र फडणवीस रोजगार देण्याचा खोटा वायदा करीत आहेत व हजारो तरुणांच्या ‘चुली’ पेटवणाऱ्या वडा-पाव उद्योगाला कमी लेखत आहेत, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’तून करण्यात आली आहे. (BMC Election 2026)

शिवाजी पार्कच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस ताळतंत्र सोडून बोलले. ते म्हणतात, “शिवसेनेने मराठी मुलांना फक्त वडा-पावच्या गाड्या दिल्या. आम्ही त्यांना उद्योग व रोजगार देऊ.” फडणवीसांचे हे विधान साठ वर्षांपूर्वी वडा-पाव खाऊन ‘मराठी’ न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्यांचा अपमान करणारे आहे. साठ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी मुंबईत मराठी तरुणांना नोकऱ्या, रोजगारातून डावलले जात होते. शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली मराठी माणूस एकवटला होता. त्या वेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले, “आज नोकऱ्या मिळत नसतील तर रिकामे बसू नका. वडा-पावच्या गाड्या लावा.” त्यानंतर मुंबईतील ‘वडा-पाव’ प्रसिद्ध झाला. ते एक रोजगार आणि आर्थिक उलाढालीचे साधन बनले. मुंबई-महाराष्ट्रात ‘वडा-पाव’च्या गाड्यांनी मोठा रोजगार मिळवून दिला. आज ‘वडा-पाव’ न्यूयॉर्क, इंग्लंड, युरोपियन राष्ट्रांत पोहोचला. पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘वडा-पाव’ मिळत असला तरी लोक आवडीने ‘वडा-पाव’ खातात तो शिवसेनेच्या गाड्यांवरच. वडा-पावचे महात्म्य आणि महत्त्व फडणवीस सारख्यांना कळणार नाही. कारण त्यांना कष्ट करून घामाची कमाई करणाऱ्या शेकडो कष्टकऱ्यांची घृणा वाटते, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मराठी माणसाचा वडा-पाव ‘इंटरनॅशनल’ झाला याचा अभिमान बाळगायचे सोडून ते वड्यात विष कालवत आहेत. दक्षिणेतील राज्यकर्ते ‘इडली’ विक्रीवर टीका करीत नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री लिट्टी चोखाचा अभिमान बाळगतात. दिल्लीत ‘कचोरी समोसा’ हा उद्योग आहे. पंजाबात ‘मिस्सी रोटी आणि लस्सी’चा बोलबाला आहे. कर्नाटकात ‘बेन्ने डोसा’ जोरात आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झुणका-भाकर, वडा-पावचा द्वेष करतात. महाराष्ट्राला हे असे राज्यकर्ते लाभले हे दुर्दैवच म्हणायला हवे. वड्याच्या उकळत्या तेलात या वेळी मराठीद्वेष्ट्यांना तळून, भाजून काढले पाहिजे. फडणवीस इडली सांबर, ढोकळा-फाफडाचे कौतुक करतील, पण मराठी वडा-पाव दिसला की, त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होतो. फडणवीस यांना हे माहीत असायला हवे की, गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत ‘वडा-पाव’ आवडीने खातात. मोठ्या वर्गाचे ते अन्न आहे. फडणवीसांचे लाडके अमित शहा मुंबईत येऊन ‘वडा-पाव’वरच ताव मारतात व हा ‘वडा-पाव’शिवसैनिकांच्या गाडीवरचाच असतो. महाराष्ट्राच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या चार-पाच पिढ्या मराठमोळ्या वडा-पाववरच पोसल्या याचा अभिमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असायला हवा, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

आणखी वाचा

तुम्ही मराठी माणसासाठी वडापावच्या गाडीशिवाय दुसरं स्वप्नच पाहिलं नाही; देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका

आणखी वाचा

Comments are closed.