इंद्रजित सावंतांना घरात घुसून मारण्याची धमकी, देवेंद्र फडणवीसांचे कोल्हापूरच्या एसपींना महत्त्व

मुंबई: इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तुम्हाला घरात घुसून मारु, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. डॉ. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या व्यक्तीने आपण इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला. माझ्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केला असावा, असे कोरटकर यांनी म्हटले. मात्र, इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचे प्रकरण राज्याच्या गृहखात्याने गांभीर्याने घेतले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरुन चर्चा केली आहे. इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात कारवाईला वेग येणार आहे. प्रशांत कोरटकर यांनी त्यांनी फोन केल्याचे नाकारल्यामुळे इंद्रजित सावंत यांना फोन करुन धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.

इंद्रजित सावंतांना तातडीने सुरक्षा द्या, रोहित पवारांची मागणी

प्रसिद्ध इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून देण्यात आलेली धमकी निषेधार्ह आहे. सावंत यांनी इतिहास संशोधनात केलेलं कार्य महाराष्ट्र आणि येणाऱ्या पिढीसाठी मोलाचं आहे. अशात कोण तो प्रशांत कोरटकर नामक व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल, तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही.

महाराष्ट्रात नेहमीच विचारवंत, संशोधक आणि इतिहासकार यांना आदराचे स्थान राहिलेलं आहे. पण एका विशिष्ट हेतूने पुरोगामी विचारवंतांवर हल्ले करण्याची मानसिकता महाराष्ट्रासाठी शोभणारी नाही. पुरोगामी विचारवंतांवर पूर्वी झालेले जीवघेणे हल्ले पाहता इंद्रजित सावंत यांना सरकारने तातडीने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी आणि धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ही विनंती.

‘ब्राह्मण भालजी पेंढारकर नसते तर तुमचा छत्रपती जगाला माहिती झाला नसता’

इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन त्यांना आलेल्या फोन कॉलच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप पोस्ट केली आहे. यामध्ये एक व्यक्ती इंद्रजित सावंत यांना धमकावत आहे. “तुम्ही कोल्हापूरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी लेखू नका. तुम्हाला हा महाराष्ट्र मराठमोळा वाटत असेल पण ब्राह्मणांची काय ताकद होती, ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बघा. तुम्ही जास्त बोलू नका. एक दिवस तुम्हाला ब्राह्मणांची औकात दाखवून देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालाजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहिती नसतं पडलं. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता. तुम्हाला ब्राह्मणांविषयी इतका द्वेष आहे. ब्राह्मणांना काही बोललात तर घरात घुसून मारू, अशी धमकी देत संबंधित व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केली होती. इंद्रजित सावंत यांनी ही क्लीप सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=6eo41d9ydns

आणखी वाचा

‘छावा’मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम…; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..

Comments are closed.