राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रश्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपरमध्ये 69 व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचं उद्घाटन केल्यानंतर विविध मुद्यावर संवाद साधला. पेट्रोलचा साठा, राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण चर्चा, भोंदूबाबा अशोक खरात याच्या संदर्भात रुपाली चाकणकर यांना मिळालेलं चौकशीचं समन्स या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. पेट्रोल पंपावर स्थिती सामान्य आहे, यासंदर्भात विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही अफवा पसरवू नये असं म्हटलं. ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या तेव्हा सांगत होतो, रांगा लावू नका. तरीही काही लोकं अफवा पसरवत होते.आता अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे, त्यामुळं रांगा लागणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मला असं वाटतं की कुठली ती स्टेज नाही की मी कमेंट करावं. त्यांचं आपापसात कोणी बोललं असेल तर मला असं वाटतं,शेवटी कसं आहे की समजा सुनेत्राताई पवारांचं काय मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काय मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील. प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही त्याचं कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. पक्ष जिथे मला पाठवेल, तिथे मी जाईन. आसाम आणि केरळ या दोन राज्यांमध्ये तरी मी निवडणूक प्रचारासाठी जाणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
रुपाली चाकणकर यांना समन्स, मुख्यमंत्री काय म्हणाले?
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनासमन्स देण्यात आलं आहे, याबाबत माझ्याकडे सध्या कोणतीही माहिती नाही. या प्रकरणाची सध्याची स्थिती काय आहे, हेही मला माहीत नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही; आवश्यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्य वेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक
69 व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचं यजमानपद महाराष्ट्राच्या नागपूरला मिळालेला आहे. ज्यावेळी ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट हे 1959 मध्ये सुरू झालं होतं तेव्हा ते पहिल्यांदा नागपूरतच आयोजित करण्यात आलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ड्युटी मीट मध्ये सायबर आणि कम्प्युटर अवेअरनेस ,पोलीस डॉग कॉम्पिटिशन, व्हिडिओ ग्राफी इत्यादी विषयावर चर्चा होतील स्पर्धाही होतील आणि काही ज्ञानाचं आदान प्रदान होईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आपले पोलीस फोर्स चांगले काम करत आहे, फॉरेन्सिक असिस्टंट मुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील एक मोठ्या दल म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्राचं पोलीस दल आधुनिक दल म्हणून पाहिलं जातं.आता नव्या तंत्रज्ञानामध्येही महाराष्ट्र चांगले काम करत आहे, सर्वात चांगली सायबर लॅब महाराष्ट्रात तयार करण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.