आधी माझी शक्ती कमी केली म्हणत पक्ष नेतृत्वावर टीका; मुनगंटीवार फडणवीसांच्या भेटीला पोहोचताच काय

Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Meet: राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचा गाजावाजा असताना चंद्रपूरमध्ये (Chandrapur Nagarparishad Election Result) मात्र, भाजपाला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. चंद्रपुरातील 11 पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर भाजपाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मात्र थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलं होतं. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनी नाव न घेता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून आलं. सुधीर मुनगंटीवारांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. यानंतर काल (23 डिसेंबर) सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. या भेटीत काय घडलं?, याची माहिती सुधीर मुनगंटीवारांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. (Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Meet)

फडणवीसांच्या भेटीनंतर मुनगंटीवार काय म्हणाले? (Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Meet)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर 20 हजार बोनस, आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख 31 जानेवारीपर्यंत वाढविणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून 3 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मदत, तसेच बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल व महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पावर हाऊसची 31.35 हेक्टर मधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच आदी विषयांवर आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी दाखवलेल्या या संवेदनशील व दूरदर्शी भूमिकेबद्दल त्यांचे मनस्वी आभार, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार नगरपालिकेच्या निकालानंतर नेमकं काय म्हणाले होते? (सुधीर मुनगंटीवार)

चंद्रपुरात झालेल्या पराभवावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही हा पराभव नम्रतापूर्वक स्वीकारतो. विजय झाल्यावर माजायचं नाही, पराभव झाल्यावर लाजायचं नाही. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. चंद्रपूरमध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण व्हावं असं आमच्या पक्षाचं धोरण दिसतं. त्यातून मग 11 नगरपालिकांमध्ये गटबाजी अनुभवली आहे. शनिशिंगणापूर नंतर आमचा एकमेव पक्ष आहे ज्याचे दरवाजे इतरांसाठी कायम खुले असतात, त्यामुळे कुणीही पक्षात येतो असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला. पक्षात प्रवेश देताना जिल्हा अध्यक्षांना किंवा जिल्ह्यातील नेत्यांना विचारलं जात नाही, कुणालाही प्रवेश दिला जातो. तसेच बाहेरच्या लोकांना पक्षात प्रवेश देऊन नवीन गट निर्माण केले जात असल्याची टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Sudhir Mungantiwar : काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली; चंद्रपुरातील पराभवानंतर सुधीर मुनगंटीवारांची खदखद

आणखी वाचा

Comments are closed.