देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावल
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याची क्षमता असलेले शरद पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे सध्या भाजपच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोमवारी राहुरीत (Rahuri Byelection 2026) पार पडलेल्या सभेवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार हवा होती. मात्र, तसे काही घडलेले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत जाहीरपणे प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार मानत अनेक नव्या शक्यतांना आणि राजकीय समीकरणांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Maharashtra Politics)
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला. मी त्यांना म्हटले की, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा जुनाजाणता नेता आपल्यातून गेलाय, ही पोटनिवडणूक आहे. तुम्ही या निवडणुकीतून माघार घेतली तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याला धरुन निर्णय घ्यावा. एका मिनिटांत प्राजक्त तनपुरेंनी माझं म्हणणं मान्य केलं, ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, माघार घेतली. यासाठी मी त्यांचे जाहीरपणे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
प्राजक्त तनपुरे सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यादृष्टीने सोमवारी दिवसभर आणि गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी सातत्याने चर्चा करत होते. मात्र, भाजपमध्ये जायचे की नाही, याबाबतचा त्यांना निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, या सगळ्यामुळे राहुरीच्या राजकारणात भाजपच्या अक्षय कर्डिले यांच्यापेक्षा प्राजक्त तनपुरे यांचीच जास्त चर्चा रंगली आहे.
Rahuri Byelection 2026: शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षा दीडपट जास्त प्रेम अक्षयवर करु, त्याला राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देऊन जातोय: देवेंद्र फडणवीस
शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षा दीडपट जास्त प्रेम अक्षयवर करु. आमच्याकडून एखादं काम शिवाजीराव कर्डिले यांचे करायचे राहिले असेल पण अक्षयचे सर्व काम आम्ही पूर्ण करु, हे आम्ही सांगायला आलो आहे. संग्राम जगताप, सुजय विखे यांनी या निवडणुकीची धुरा अतिशय चांगल्याप्रकारे हातात घेतली आहे. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत हे शिवाजीराव कर्डीले यांना दिलेली श्रद्धांजली असेल. कृषी विद्यापीठातील अधिकची जी जागा आहे , त्यातील एक हजार एकर जागा आपल्याला एमआयडीसीसाठी देता येईल. राहुरी एमआयडीसीचे पुर्नजीवन करायचे आहे. अक्षय कर्डिलेला मी राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देऊन जात आहे. राहुरीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी कर्जमाफी अस्तित्वात आणणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना भविष्यातही मोफत वीज दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केला. शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या विरोधकांनी त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचे काम केले. मातृशक्तीला विरोध करणाऱ्या लोकांना माता भगिनी नक्कीच त्यांची जागा दाखवतील. या निवडणुकीत सर्व माता भगिनींनी जास्तीत जास्त मतदान करायला हवे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Akshay Kardile news: शिवाजीराव कर्डीले हे अतिशय धोरणी राजकारणी होते, कोणाला नेता करायचं, आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना ठाऊक होते: देवेंद्र फडणवीस
ही पोटनिवडणूक आली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता. शिवाजीराव कर्डीले यांच्याबाबत आपल्या प्रत्येकाजवळ काही न काही आठवणी आहेत. शिवाजीराव कर्डीले यांच्या ठायी जनतेचा विषय असायचा. शिवाजीराव कर्डीले हे अतिशय धोरणी राजकारणी होते. कोणाला नेता करायचं, आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना ठाऊक होते. कर्डीले साहेबांनी मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यावरही आराम केला नाही. जनतेची सेवा सेवा करत करत त्यांनी शरीराचा ऱ्हास करून घेतला. या अडचणीच्या काळातही ते डगमगले नाही. त्यांचे जाण्याचे वय नव्हते, पुढे मोठे राजकिय कारकीर्द होती.
ते भेटले की नेहमी ते निळवंडे प्रश्न आणि, वांबोरी चारी बाबत बोलायचे. वांबोरी चारीसाठी 125 कोटी रुपये मंजूर केले. समुद्रात वाहून जाणारं 75 टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम भागात आणण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सर्वच धरणातील गाळ काढून पाणी साठा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.