देवळाली प्रवरात रस्त्यांची दैना; जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एकेकाळी स्वच्छता, सुशोभीकरण आणि दर्जेदार रस्त्यांमुळे जिल्ह्यातपासून देशपातळीपर्यंत नावलौकिक मिळवलेल्या देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिक सत्ताधारी आणि विरोधकांवर संताप व्यक्त करत आहेत.

सन 2001 मध्ये तत्कालीन गृह व नगरविकासमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानात देवळाली प्रवरा शहराने उल्लेखनीय कामगिरी केली होती. तत्कालीन नगराध्यक्ष स्व. बाळासाहेब चव्हाण यांनी शहराचा चेहरामोहरा बदलला. त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी भविष्यातील गरज लक्षात घेऊन शहरातील रस्ते रुंद व सुशोभित केले. पुढील काळातही ही विकासाची परंपरा कायम राहिली. मात्र, सध्या शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. सोसायटी डेपो ते बाजारतळ तसेच मातंग वस्ती ते चारी या मार्गांची अवस्था विशेषतः बिकट झाली असून, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 70 कोटी रुपयांची कामे झाली. या कामांनंतर रस्त्यांची करण्यात आलेली जुजबी दुरुस्ती आणि त्यानंतर पडलेले खड्डे यामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच खराब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरवाढीवरही नागरिकांची मौनसंमती?
निवडणुकीनंतर पाणीपट्टी 1800 रुपयांवरून थेट 3 हजार रुपये करण्यात आली. तसेच नगरपरिषदेकडील विविध दाखले व कामकाजाच्या शुल्कात वाढ करण्यात आली. या निर्णयाविरोधात विरोधकांनी आंदोलने केली; मात्र नागरिकांकडून अपेक्षित तीव्र विरोध झाला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात रोष असूनही नागरिक आणि विरोधक ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.

शहराचे नाक तरी दुरुस्त करा – पठारे

शहरातील रस्त्यांची अवस्था भयानक आहे. काही खड्डे बुजवण्यासाठी आम्ही स्वतः खर्च करण्यास तयार असल्याचे नगराध्यक्षांना सांगितले आहे. रस्त्यांची साधी डागडुजी करण्याऐवजी इतर ठिकाणी पैसे खर्च केले जात आहेत. मुरुम टाकल्याने चिखल होईल. मात्र, तुर्तास खड्डे बुजवल्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो. शहराचे नाक तरी दुरुस्त करा. सोसायटी डेपो ते बाजारतळ रस्ता एका बाजूला सरकवून एक साईड वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने हे काम रखडले आहे, असे विरोधी पक्षनेते तुकाराम पठारे यांनी सांगितले.

शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सर्व रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची गरज आहे. प्रशासकीय काळात भुयारी गटाराचे काम झाल्यानंतर रस्ते भरल्याने ते खराब झाले. एकाचवेळी सर्व रस्त्यांची कामे करणे शक्य नाही. 15व्या वित्त आयोगातून रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
— सत्यजित कदम, नगराध्यक्ष

Comments are closed.