धनंजय मुंडेंनी ‘ती’ फाईल गायब केली, उपसचिवांकडून कन्फर्म; अंजली दमानियांचा दावा, पत्र शेअर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुडेंवर (Dhananjay munde) कृषीमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होते. तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, कृषी साहित्य खरेदीप्रकरणात धनंजय मुंडेंना हायकोर्टात दिलासा मिळाला होता. त्यावर भाष्य करताना धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळाली नसल्याचं दमानिया यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा अंजली दमानिया आक्रम झाल्या असून लोकायुक्तांसमोर सुरू असलेल्या चौकशीची माहिती देताना त्यांनी धनंजय मुंडेंकडून फाईल गायब करण्यात आल्याचे म्हटले आहे.

धनंजय मुंडेंनी, कृषी सचिव ‘व्ही. राधा’ यांची फाइल गायब केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मॅडम व्ही. राधा या कृषी सचिव असतांना, कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल त्यांनी मंत्र्यांना पाठवली. मात्र, ही फाइल धनंजय मुंडेंनी गायब केली. लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान, आज मी हे लोकायुक्तांपुढे मांडल्यानंतर, प्रतिभा पाटील नावाच्या उप सचिवांनी लोकायुक्तांना कन्फर्म केले, की ही फाइल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे. पण, ही फाईल त्यांच्याकडून राजीनाम्यानंतर परत आली नाही, अशी माहिती अंजली दमानिया यांनी ट्विट करुन दिली आहे.

दमानियांकडून पत्र शेअर

धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांकडून देण्यात आले आहे. आत्ता 5 मिनिटापूर्वी मला शासनाकडून हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती देत दमानिया यांनी पत्रही शेअर केलं आहे. कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने, कृषि आयुक्तालयाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन प्र.स. (कृषि) यांनी तत्कालीन मंत्री (कृषि) यांच्याकडे जो अहवाल सादर केलेला आहे, त्याबाबतच्या अहवालाची आपण दूरध्वनीद्वारे उपसचिव (कृषि) यांचेकडे मागणी केलेली आहे. याबाबत आपणास कळविणेत येते की, सदर अहवाल या कार्यासनाकडे कार्यवाहीसह परत प्राप्त झालेला नाही. तसेच, सदर अहवाल या कार्यासनास उपलब्ध करून देण्याबाबत तत्कालीन मंत्री (कृषि) यांचे खासगी सचिव यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. त्यामुळे, सदर नस्ती उपलब्ध झाल्यानंतर आपणास त्याप्रमाणे कळविण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या कक्ष अधिकारी यांच्या पत्राने अंजली दमानिया यांना देण्यात आली आहे.

हेही वाचा

खासदार प्रतिभा धानोरकरांच्या दीराचा भाजपात प्रवेश; ठाकरेंच्या शिवसेनेला विदर्भात पुन्हा ‘दे धक्का’

आणखी वाचा

Comments are closed.