धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेलं, पण संतोष देशमुख प्रकरणातील कारवाईपासून अभय? महत्त्वाची अपडेट

मुंबई: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या 80 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resing) यांच्यातील नैतिकता आणि विवेकबुद्धी जागृत न झाल्यामुळे ते मंत्रि‍पदी कायम राहिले होते. अखेर सोमवारी संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे क्रौर्याची परिसीमा दाखवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोमवारी रात्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची सूचना दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार धनंजय मुंडे यांनी निमूटपणे आपल्या सहकाऱ्यांकरवी आपला राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पाठवून दिला होता. त्यांचा हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

एकीकडे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेले असले तरी आगामी काळात संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांना अभय दिले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोप केले जाणार नाही. सीआयडीच्या आरोपपत्रात धनंजय मुंडे यांच्याविरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही धनंजय मुंडे यांच्याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही. राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवून असेल, असे समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली होती. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना उद्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या, अशी सूचना केली होती. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार की नाही, हे बघावे लागेल. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

https://www.youtube.com/watch?v=SXGMR0KK_-G

आणखी वाचा

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला, दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला!

मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय, त्यांना पदमुक्त केलंय; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अधिक पाहा..

Comments are closed.