धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रिपदा
धनंजय मुंडे राजीनामा: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा (Dhananjay Munde Resignation) का घेतला जात नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. यानंतर सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे याच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. यानंतर आज मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होता. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज आहेत. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलंल काय, फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपदे किती आली किती गेली. छगन भुजबळ संपला नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘या’ नावांचीही चर्चा
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन समीकरणांची चर्चा होत आहेत. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? अशा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांच्या पुनर्वासनाची शक्यता वर्तवली जात आहे. तर प्रकाश सोळंके, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांच्या देखील नावाची चर्चा सुरु आहे. आता राष्ट्रवादीतून नेमकी कोणत्या नेत्याला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=D992G8DIEN0
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.