अदानीविरोधात आज धारावीत सर्वपक्षीय मोर्चा, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व

धारावी बचाव आंदोलन तीव्र झाले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सरकार आणि अदानी समूहाच्या मनमानी कारभाराविरोधात रहिवाशांनी रणशिंग फुंकले आहे. विकासाचे स्वप्न दाखवून धारावीतील सर्वसामान्य भूमिपुत्रांना बेघर करण्याचा प्रयत्न अदानी समूहामार्फत केला जात आहे. स्थानिक रहिवासी व लघुउद्योजकांवर विकासाच्या नावाखाली होत असलेल्या अन्यायाला वाचा पह्डण्यासाठी, उद्या शनिवारी सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात येणार असून  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. हा मोर्चा सकाळी 11 वाजता धारावीतील मुकुंद नगर येथील त्रिकोणी गार्डन येथून निघून ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’वर धडकणार आहे. या आंदोलनासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक रहिवासी हजारोंच्या संख्येने एकवटणार आहेत.

सुमारे 550 एकरवर पसरलेल्या धारावीतील विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने मुंबई परिसरात जवळपास 1200 एकर जमीन अदानी समूहाच्या घशात घातली आहे. या माध्यमातून धारावीकरांना त्यांच्या मूळ स्थानापासून हटवून मुंबईतील डम्पिंग ग्राउंडसारख्या आरोग्यास विघातक ठिकाणी विस्थापित करण्याचा डाव आखला जात असल्याचा संताप धारावीकरांनी व्यक्त केला आहे. तसेच धारावीतील गरीब जनता, लघुउद्योजक आणि पारंपरिक उद्योगधंद्यांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पाकडून आजवर कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. त्यातच धारावी हे ‘बिझनेस डेव्हलपमेंट हब’ होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे येथील मूळ रहिवासी व लघुउद्योजकांना हटवून ही मोक्याची जागा उद्योगपतींच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी चिंता धारावीकरांना आहे.

धारावीकरांवरील हा अन्याय जगासमोर आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. आज धारावीवर आलेली ही वेळ उद्या मुंबईतील इतर भागांवरही येऊन मोक्याच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जाऊ शकतात. त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य जनतेने या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

या आंदोलनाला शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते – आमदार अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आपचे खासदार संजय सिंह, शेकापचे नेते जयंत पाटील, खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष मिलिंद कांबळे, आमदार महेश सावंत, ज्योती गायकवाड, सपाचे आमदार अबू आझमी, माजी आमदार बाबुराव माने, राजू कोरडे आणि ‘आप’च्या प्रीती मेनन यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

विकासाच्या नावाखाली आमचे अस्तित्व पुसण्याचा डाव

धारावी ही केवळ पुनर्विकासासाठी उपलब्ध असलेली जमीन नाही, तर लाखो कष्टकरी नागरिकांचे घर, रोजगाराचे केंद्र आणि अनेक पिढय़ांच्या संघर्षातून उभी राहिलेली वस्ती आहे. अदानी समूहाच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली धारावीकरांचे हक्क, घरे आणि अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीच्या घराघरात, गल्लीबोळांत आणि वस्ती-वस्तीत जोरदार प्रचार व जनजागृती करण्यात येत आहे.

रहिवाशांच्या मागण्या

झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचे आणि इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे घर धारावीतच मिळाले पाहिजे.

पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जाहीर करावा.

स्थानिकांचे रोजगार, व्यवसाय, सामाजिक अस्तित्व आणि पिढय़ान्पिढय़ा जपलेली धारावीची ओळख कायम राखावी.

स्थळ ः मुकुंद नगर, त्रिकोणी गार्डन

वेळ ः सकाळी 11 वाजता

Comments are closed.