द्रमुकचे लोकसभा अध्यक्षांना पत्र काँग्रेसवर नाराज
काँग्रेसवर संतप्त द्रमुकचे लोकसभा अध्यक्षांना पत्र : वेगळी आसनव्यवस्था पुरविण्याची विनंती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीचा घटक पक्ष द्रमुकने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सभागृहात पक्षाच्या खासदारांच्या बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती केली आहे. काँग्रेससोबतची आमची आघाडी संपुष्टात आली असल्याने आमच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांसोबत बसणे योग्य नाही असे बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात द्रमुकने म्हटले आहे. द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांनी बदललेली राजकीय स्थिती पाहता लोकसभा अध्यक्षांना शुक्रवारी पत्र लिहून आसनव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली आहे. बदललेली राजकीय स्थिती अणि काँग्रेससोबतची आमची आघाडी संपुष्टात आली असल्याचे कनिमोझी यांनी पत्रात नमूद केली आहे. लोकसभेत द्रमुकचे एकूण 22 खासदार आहेत.
लोकसभेत वेगळ्या ठिकाणी स्थान मिळावे
द्रमुकच्या खासदारांसाठी वेगळ्या ठिकाणी आसनव्यवस्था केली जावी, जेणेकरून त्यांना स्वत:ची जबाबदारी प्रभावीपणे पार पडता येईल असेही कनिमोझी यांनी बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आडहे. काँग्रेसने तामिळनाडू विधानसभा निवडणूक द्रमुकसोबत आघाडी करत लढविली होती. काँग्रेसला केवळ 5 जागा जिंकता आल्या होत्या. परंतु राज्यात टीव्हीकेला सर्वाधिक जागा मिळाल्यावर काँग्रेसने द्रमुकसोबतची आघाडी संपुष्टात आणत नव्या पक्षासोबत हातमिळवणी केली आहे.
पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप
काँग्रेसने द्रमुकसोबत आघाडी करत निवडणूक लढविली होती. परंतु आता काँग्रेसने टीव्हीकेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने द्रमुक संतापला आहे. द्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या या कृत्याला ‘पाठीत खंजीर खुपसणे’ आणि ‘विश्वासघात’ ठरविले आहे. द्रमुकने 2014 ची निवडणूक एकट्यानेच लढविली होती असे सांगत काँग्रेसने धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करणे आणि भाजपला मागील दारातून सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विजय यांच्या पक्षाचे समर्थन करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.
संसदेत दिसणार नवा राजकीय संदेश
लोकसभेत आसनव्यवस्था केवळ बसण्यापुरती मर्यादित नसते. तर ही राजकीय समीकरणे आणि पक्षांमधील संबंधांचे प्रतीकही मानली जाते. अशास्थितीत द्रमुकचे हे पाऊल राष्ट्रीय राजकारणात नवा संदेश म्हणून पाहिले जातेय. याप्रकरणी लोकसभा सचिवालय किंवा अध्यक्ष कार्यालयाकडून अद्याप कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. परंतु द्रमुकच्या या पत्राने संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी राजकीय चर्चांना वेग दिला आहे.
Comments are closed.