आंतर-विद्यापीठ खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे यश; अश्विनी शिंदे ठरली ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ खो-खो स्पर्धा (महिला) 2025–26 चा अंतिम सामना बुधवारी सायंकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विजेतेपद पटकावले, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाने उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक मुंबई विद्यापीठाने, तर चतुर्थ क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावला. देशभरातील विविध विद्यापीठांच्या संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली होती.
बुधवारी सायंकाळी पार पडलेला अंतिम सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला. सामन्याच्या सुरुवातीला एसएनडीटी विद्यापीठाने 4 गुण मिळवले, परंतु मराठवाडा विद्यापीठाने 7 गुण मिळवत 3 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुसऱ्या डावात एसएनडीटीने चिवट झुंज देत 3 गुण मिळवले, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने संयमित खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदाला गवसणी घातली. विजेत्या संघाच्या पूजा फरगडे हिने 5 गडी बाद करत विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर अश्विनी शिंदे हिला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
एसएनडीटी विद्यापीठाकडून अश्विनी शिंदे, दिव्या सरिता आणि विद्या मीरके यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या वीणा परब यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्र-कुलगुरू रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमुळे महिला खेळाडूंमधील संघभावना आणि क्रीडा कौशल्य अधिक वृद्धिंगत झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
Comments are closed.