मुंबई इंडियन्सच्या पराभवास कोण जबाबदार? सामन्यानंतर हार्दिक पांड्याची स्पष्ट प्रतिक्रिया…

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर 103 धावांनी दणदणीत विजय मिळवत आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव त्यांच्या नावावर केला. वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (23 एप्रिल) झालेल्या या सामन्यात चेन्नईने सर्वच विभागांत मुंबईला पूर्णपणे मागे टाकले.

भारताचा टी20 विश्वचषक विजेता स्टार संजू सॅमसन याने शानदार पुनरागमन करत नाबाद 101 धावांची खेळी केली. आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे पाचवे शतक ठरले, तर चेन्नईसाठी अवघ्या चार डावांत दुसरे शतक झळकावले. 54 चेंडूत त्याने 10 चौकार आणि 6 षटकार ठोकत सामन्याचे पारडे एकहाती फिरवले.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 207/6 असा भक्कम धावसंख्या उभारली. सॅमसन एका बाजूने स्थिर राहिला, तर दुसऱ्या टोकाला ऋतुराज गायकवाड (22) आणि डेवाल्ड ब्रेविस (21) यांनी महत्त्वपूर्ण हातभार लावला. मुंबईकडून अश्विनी कुमार आणि अल्लाह गजनफर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह याने नियंत्रित गोलंदाजी करत 1/31 अशी कामगिरी केली.

धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. नियमित अंतराने गडी बाद होत राहिल्याने संपूर्ण संघ 19 षटकांत 104 धावांत गुंडाळला गेला. तिलक वर्मा (37) आणि सूर्यकुमार यादव (35) यांच्याशिवाय इतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.

चेन्नईकडून गोलंदाजीत अकील हुसैन याने 4/17 अशी जबरदस्त कामगिरी करत मुंबईच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्याला नूर अहमद याने 2/23 अशी साथ दिली. या फिरकी जोडीने मुंबईला पूर्णपणे जखडून ठेवले.

दरम्यान, मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या याने पराभवानंतर स्पष्ट शब्दांत फलंदाजीवर टीका केली. “पॉवरप्लेमध्ये लवकर गडी बाद होणे हेच पराभवाचे मुख्य कारण ठरले. त्या दबावातून आम्ही बाहेर पडू शकलो नाही,” असे तो म्हणाला. त्याने खेळपट्टीला कोणताही दोष न देता चेन्नईच्या फलंदाजीचे कौतुक केले.

दुसरीकडे, चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने हा विजय मुकेश चौधरी याला समर्पित केला. “संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्यासाठी खेळत होता, त्यामुळेच ऊर्जा अधिक होती,” असे त्याने सांगितले.

Comments are closed.