कलारंग – कुंचल्यातून जिवंत झालेले देवघर
<< डॉ.गजानन सीताराम शेपाळ
चित्रकार दीपक रमेश पाटील यांच्यासाठी चित्रकला म्हणजे केवळ रंग आणि कुंचल्याचा खेळ नाही. ती एक उपासना आहे आणि हीच उपासना म्हणजे समर्पण, असे ते सांगतात. त्यांच्या याच भावनेतून 24 ते 30 नोव्हेंबर 2026 या सप्ताहात वरळी येथील नेहरू सेंटरच्या कलादालनात ‘समर्पण’ हे प्रदर्शन संपन्न होत आहे. हे प्रदर्शन म्हणजे केवळ चित्रांची मांडणी नाही, तर महाराष्ट्र धर्म आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित केलेला समर्पण सोहळा आहे.
दीपक रमेश पाटील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1983 रोजी धुळे जिह्यातील कापडणे येथे झाला. त्यांनी जी. डी. आर्ट (पेंटिंग) आणि डिप्लोमा ए. एड. पूर्ण केले. त्यांना अध्यापन, प्रशासन आणि संस्थात्मक कार्याचा 16 वर्षांचा अनुभव आहे. 2003 ते 2009 मध्ये कला महाविद्यालय, खोपोली येथे कला शिक्षक आणि 2010 ते 2018 मध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या कला प्रवासाचे वैशिष्ट्य केवळ चित्रनिर्मितीत नाही. भारतीय कला, शिल्प परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि दुर्मीळ कलावस्तूंचे जतन यांच्याशी जोडलेली व्यापक दृष्टी यात आहे. सर्जनशीलता, अभ्यास, कलासंग्रह आणि वारशाबद्दलची आस्था यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसतो.
देश-विदेशात गाजलेली चित्रे
निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, भित्तिचित्र, जलरंग आणि अॅक्रिलिक या माध्यमांतील प्रभुत्वामुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गौरव मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन’ने त्यांच्यावर आठ पानांचा विशेष लेख प्रसिद्ध केला. अमेरिकेतील बोल्ड ब्रश स्पर्धेत आऊटस्टँडिंग अॅक्रिलिक अवॉर्ड (2012) आणि रे-मार-आर्ट स्पर्धेत बेस्ट ऑफ शो अवॉर्ड (2012) त्यांना मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या इंटरनॅशनल आर्टिस्ट अवॉर्डमध्ये निसर्गचित्र आणि आवडत्या विषयासाठी त्यांना सन्मान मिळाला. भारतात स्टेट आर्ट अवॉर्ड, मुंबई (2012), गुलबर्गा कला अकादमी अवॉर्ड (2011) आणि राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार (2010) हे त्यांचे महत्त्वाचे सन्मान आहेत. नाशिक, पुणे, उज्जैन येथील स्पर्धांमधून त्यांना अनेक प्रथम पारितोषिके मिळाली आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी, बजाज आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर, ठाणे टाऊन हॉल आणि चेन्नईतील स्टुडिओ पॅलाझो येथे त्यांची एकल प्रदर्शने झाली आहेत. ते क्युरेटर म्हणूनही कार्यरत आहेत.
चित्रांतून उलगडणारा महाराष्ट्र
‘समर्पण’मधील चित्रे महाराष्ट्राच्या संपन्न संस्कृतीचे दर्शन घडवतात. देवघरात दिवा ओवाळणारी गृहिणी, गणपतीसमोर हात जोडून बसलेली आई-मुलगी, माळ गुंफणारी आई, रामनवमीच्या दिवशी पूजा करणारी आई-कन्या, कृष्णभक्तीतील मुरलीधर, बाप्पांची कृपाळू नजर आणि वधू-सखींमधील हितगुज या सगळ्यांतून भक्ती, मातृत्व, नाती आणि परंपरा उलगडतात. दिवा देवघर उजळवतो, तर आईचे मार्गदर्शन, कोवळ्या मनाचा मार्ग प्रकाशित करते. वेगवेगळी फुले एका धाग्याने जोडली जातात, तसेच प्रेम आणि श्रद्धा कुटुंबाला जोडतात. जिथे रामनाम स्मरले जाते, तिथे घर हेच मंगल भवन बनते. बाप्पांच्या शुभ नयनांतून भक्ताला दिलासा मिळतो. हितगुजमध्ये एक कुजबुज आठवण बनते आणि एक क्षण काळातीत होतो.
चित्रकार दीपक रमेश पाटील अॅण्ड आर्ट कल्चर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते कला आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करत आहेत. दुर्मीळ शिल्पे, चित्रे आणि कलावस्तू यांचे जतन करून त्यांचा अभ्यास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा उद्देश आहे. भविष्यात कला दालन आणि मिनी म्युझियम उभारण्याची त्यांची संकल्पना आहे. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी फाऊंडेशनचा पुरस्कारही सुरू केला आहे. 2024 मध्ये रोहित गुप्ता, 2025 मध्ये रश्मित एस. नारकर आणि 2026 मध्ये
अजित शंकर राऊत यांना जहांगीर आर्ट गॅलरी येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रकार, शिक्षक, प्राचार्य, संग्राहक, क्युरेटर आणि संवर्धक अशा विविध भूमिका पार पाडणारे चित्रकार दीपक रमेश पाटील यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. कला ही समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे जतन करणारे माध्यम आहे, ही त्यांची भूमिका ‘समर्पण’मधून प्रत्यक्ष अनुभवता येते.
Comments are closed.