१५°C तापमानात २२ हजार फूट उंचीवर उडी; DRDOची लष्करी पॅराशूट चाचणी यशस्वी – TMarathiNews
लेह : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) लडाखमधील लेह जिल्ह्यात जगातील अत्यंत उंच प्रदेशांपैकी एक असलेल्या ड्रॉपझोनमध्ये मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टम (MCPS) ची यशस्वी चाचणी केली. तब्बल 22000 फूट उंचीवर आणि -15अंश सेल्सिअस तापमानात ही चाचणी घेण्यात आली.
DRDOच्या एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (ADRDE) ही पॅराशूट प्रणाली विकसित केली आहे. अत्यंत उंचीवरील प्रतिकूल हवामान आणि कमी तापमानाच्या परिस्थितीत प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची मानली जात आहे.
या चाचणीदरम्यान विंग कमांडर राहुल झा, मुख्य चाचणी जंपर, तसेच MWO आर. जे. सिंह, VM(G) आणि MWO विवेक तिवारी यांनी 22000 फूट उंचीवरून उडी घेतली. तिघांनीही नियोजित पद्धतीने पॅराशूट जंप पूर्ण केला.
उच्च उंचीवर लष्करी जवान आणि विशेष दलांच्या सुरक्षित हवाई उतरणीसाठी लढाऊ पॅराशूट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरते. लडाखसारख्या दुर्गम आणि अत्यंत थंड प्रदेशात अशा प्रणालीची चाचणी यशस्वी होणे हे भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
या यशामुळे उच्च-उंचीवरील लष्करी मोहिमा, हवाई तैनाती आणि विशेष ऑपरेशन्ससाठी स्वदेशी पॅराशूट तंत्रज्ञानाची क्षमता आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed.