कोकण किनारपट्टीवर ‘ड्रोनचा वॉच’; ठाण्यापासून देवगडपर्यंत 9 ड्रोनची गस्त, बेकायदा मासेमारीपासून घुसखोरीवर नजर
>> राजेश चुरी
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतील बेकायदा मासेमारी, परराज्यातील नौकांची घुसखोरी, एलईडी मासेमारी, ‘बुल ट्रॉलिंग’ आणि समुद्रातील संशयस्पद हालचालींवर सध्या तिसऱ्या डोळ्याची दिवसरात्र नजर राहणार आहे. ठाण्यापासून थेट देवगडपर्यंतच्या समुद्रकिनारपट्टीवर मत्स्य व्यवसाय विभाग ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवून आहे. पाकिस्तानविरोधातील‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱया कंपनीची नऊ ड्रोन महाराष्ट्राच्या सागरी हद्दीचे संरक्षण करीत आहेत.
हिंदुस्थानी लष्कराने सरहद्दीवरील सुरक्षा मजूबत करण्यासाठी ‘ड्रोन कवच’ नावाची विशेष मोहीम राबवली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतील बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचे तत्कालीन सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी ड्रोनद्वारे समुद्रावर नजर ठेवण्याची संकल्पना राबवली. या खात्याचे विद्यमान सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी या प्रकल्पाला पाठबळ दिले आहे. बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी ड्रोनची मदत घेणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य आहे. आता आंध्र प्रदेश व गोवा महाराष्ट्राचा कित्ता गिरवत आहेत.
दिवसातून तीन वेळा टेक ऑफ
या नऊ किनारपट्टीवरील ड्रोन दिवसातून तीन वेळा उड्डाण करतात. आठ किलो वजनाचे ड्रोन पंचवीस किलोमीटरच्या परिघापर्यंतचा फेरफटका मारते. सलग दोन तास हे ड्रोन समुद्रकिनारावर घिरटय़ा घालू शकते. ड्रोनवरील थर्मल पॅमेरे रात्रीही बोटीचे नाव, नोंदणी क्रमांक आणि कोणत्या राज्यातील नोंदणी आहे त्याचे पह्टो काढतात.
या समुद्रकिनारपट्टीवर ड्रोनची नजर
बोर्डी व शिरगाव (पालघर), रानगाव (ठाणे), रेवदंडा, श्रीवर्धन, हर्णे, रत्नागिरी टेबलपॉइंट, साखरी नाटे, देवगड.
कोणत्या हालचालींवर नजर?
बेकायदा एलईडी मासेमारी, पर्ससीन फिशिंग, ‘बुल ट्रॉलिंग’ किंवा ‘पेअर ट्रॉलिंग’ परराज्यातील नौकांच्या घुसखोरीवर ड्रोनमधून लक्ष ठेवतात.
मुंबईत नियंत्रण कक्ष
मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष आहे. येथून ड्रोनमार्फत समुद्रातील हालचालींवर नजर ठेवतात. नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांनाही ड्रोनमार्फत थेट दृश्ये बघता येतात.
सर्वाधिक घुसखोरी कर्नाटकमधून
राज्याच्या सागरी हद्दीत सर्वाधिक घुसखोरी कर्नाटकमधील मासेमारी नौकांची होते. गुजरातमधील बोटीही मासेमारीसाठी महाराष्ट्रात घुसतात.
हिंदुस्थानी लष्करासाठी कामगिरी
मत्स्य व्यवसाय विभागासाठी ‘शिनेल ड्रोन टेक्नॉलॉजी लिमिटेड’ (पुणे) या कंपनीची ड्रोन गस्त घालत आहेत. आम्ही लष्करासाठीही काम करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आमचा सहभाग होता, असे या कंपनीचे संचालक भूषण खोमणे अभिमानाने सांगतात.
Comments are closed.