शहागडचे नदीपात्र कोरडेठाक, राक्षसभुवन येथेही विकतचे पाणी; दशक्रिया विधी करायचा कसा?
>> रवींद्र घाडगे
पावसाने दगाबाजी केल्याने मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेली गोदावरी स्वतःच थेंब थेंब पाण्यासाठी तरसत आहे! शहागड येथे गोदापात्र कोरडेठाक पडल्याने येथे होणारे दशक्रिया विधी करण्यासाठी श्रीक्षेत्र राक्षसभुवनला जावे तर तेथेही सारखीच परिस्थिती असून, विकतच्या पाण्यावर दशक्रिया करण्याची वेळ आली आहे.
दशक्रिया विधी हा धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा संस्कार आहे. मराठवाड्यात पैठण, शहागड, राक्षसभुवन, ढालेगाव, गंगाखेड आदी गोदाकाठावर असलेल्या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यात येतात. शहागड येथे दशक्रिया विधीसाठी घाट बांधण्यात आला आहे, मात्र त्याव्यतिरिक्त कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. यंदाचा पावसाळा कोरडा गेल्याने गोदापात्र रखरखीत झाले आहे. दशक्रिया विधीसाठी लागणारे पाणीही मिळण्याची मारामार आहे. त्यामुळे शहागड ऐवजी श्रीक्षेत्र राक्षसभुवनला जाण्याची वेळ आली आहे.
पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे
नदीपात्रात अनेक महिन्यांपासून पाणी नसल्याने भाविकांसह दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विधीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ येत आहे. प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन येथे पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी श्री शनिमहाराज संस्थानचे अध्यक्ष भगवान पुराणिक यांनी केली.
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांतून भाविकांची ये-जा
श्रीक्षेत्र राक्षसभुवन हे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. शनिमहाराजांच्या साडेतीन पीठांपैकी एक प्रमुख पीठ म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. येथील श्री शनिमहाराज मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे येथे वर्षभर नागरिकांची वर्दळ असते. मात्र भयंकर पाणीटंचाईमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
विहिरीच्या पाण्यावर विधी
श्रीक्षेत्र राक्षसभुवनचे गोदापात्रही कोरडेठाक पडले आहे. झरे करूनही पाणी मिळत नाही. येथे दररोज शंभरपेक्षा अधिक दशक्रिया विधी पार पडतात. नदी परिसरात असलेल्या विहिरीतील पाण्यावर दशक्रिया विधी करण्यात येतात. मात्र पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे शेवटी पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. विहिरीतून जनरेटरच्या साह्याने पाणी उपसा करावा लागत असून, त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा खर्च येतो. त्यामुळे एका दशक्रिया विधीसाठी नागरिकांकडून एक हजार रुपये आकारण्यात येतात.
स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी
गोदावरी नदीपात्रात गेल्या महिन्यापासून पाणी नसल्याने येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी विकतचे पाणी घेऊन विधी पार पाडावा लागत आहे. त्यामुळे शासन आणि संबंधित प्रशासनाने श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी श्री शनिमहाराज मंदिराचे पुजारी दत्ता पाठक यांनी केली.
Comments are closed.