ओला कारचालकांचा एटीएम झोलचा साईड बिझनेस, एकाला अटक, अन्य दोघांचा शोध सुरू, वडाळा टी. टी. पोलिसांची धडक कारवाई
यूपीच्या प्रतापगडहून मुंबईत यायचे, इथे ओला कारचालक म्हणून काम करायचे. त्याचबरोबर गावाकडच्या दोघा तिघांसोबत एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांचे एटीएम शिताफीने चोरून पैशांची लूट करणाऱया टोळीतील एकाच्या वडाळा टी. टी. पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी यूपीला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला उचलले. त्याच्या अन्य दोघा साथीदारांचा शोध सुरू आहे.
सुदर्शन कस्तुरी हे वडाळा आरटीओ कार्यालयाजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. त्यांनी पैसे काढले, परंतु एटीएम कार्ड मशीनच्या खाच्यातच अडकून पडले. प्रयत्न करूनही निघत नसल्याने त्यांनी तेथे लिहून चिटकवलेल्या कस्टमर केअरला कॉल केला. तेव्हा समोरून बोलणाऱया व्यक्तीने कार्ड ब्लॉक करतो सकाळी ब्रँचमध्ये येऊन घेऊन जावा असे सांगितले. त्याप्रमाणे कस्तुरी निघून गेल्यावर आरोपींनी त्यांचे खाच्यात अडकलेले कार्ड पकडीने काढून पोबारा केला. मग त्या कार्डचा वापर करून एक लाख रुपये काढून घेतले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच कस्तुरी यांनी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा नोंदवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक फौजदार गोसावी व पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही तसेच संशयितांनी ज्या वाहनांनी प्रवास केला त्या आधारे तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेऊन अखेर रियासत अली (23) या भामटय़ाला पकडले. त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
Comments are closed.