व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला, कार्टूनिस्ट्स कम्बाईनच्या इन्स्टाग्राम पेजवर बंदी! मोदी सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध
देशातील काही व्यंगचित्रकारांची वैयक्तिक सोशल मीडिया खाती बंद करण्यात आलेली असतानाच, आता अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्था अर्थात कार्टूनिस्ट्स कम्बाईनच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही भारतात बंदी घालण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे देशातील व्यंगचित्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणाया अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
व्यंगचित्र हे लोकशाही व्यवस्थेतील प्रभावी अभिव्यक्तीचे माध्यम आहे. सत्ताधायांवर टीका करणे, सामाजिक प्रश्न मांडणे आणि व्यवस्थेतील विसंगती दाखवून देणे हे व्यंगचित्रकारांचे काम आहे. मात्र, व्यंगचित्रकारांच्या वैयक्तिक खात्यांनंतर आता संस्थेचे अधिकृत पेजही बंद होणे ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
‘कार्टूनिस्ट्स कम्बाईन’चे अध्यक्ष गौरव सर्जेराव, सचिव धनराज गरड, उपाध्यक्ष अमित पापळ, सुरेश राऊत, नीरज सबनीस, उदय मोहिते, वासुदेव बोंद्रे, रोहित कबाडे आणि ओंकार बागवे यांनी हा निषेध नोंदविला आहे.
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
मोदी सरकारला व्यंगचित्रांची भीती वाटते का?
मोदी सरकारला व्यंगचित्रांची भीती वाटते का? लोकशाहीत सत्तेवर प्रश्न विचारण्याचा अधिकारही आता राहिलेला नाही का? असा सवाल उपस्थित करत कार्टूनिस्ट्स कम्बाईनच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. संबंधित पेजवरील बंदी मागे घेऊन ते तातडीने पूर्ववत करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Comments are closed.