आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा ‘खेळ’; ग्राहकांवर मोठा परिणाम

खाद्यतेलाचे नवीन नियम: बाजारात खाद्यतेल खरेदी करताना अनेकदा ग्राहकांची वजनावरून दिशाभूल होत असल्याचे समोर आलं आहे. सध्या बाजारात खाद्यतेलाची पाकिटं वेगवेगळ्या आणि विचित्र वजनात विकली जात आहेत. जसे की 650 ग्रॅम, 700 ग्रॅम, 810 ग्रॅम किंवा 850 ग्रॅम. यामुळे वेगवेगळ्या ब्रँड्सच्या तेलाच्या किमतींची अचूक तुलना करणे सामान्य ग्राहकांना अत्यंत कठीण जाते. ग्राहकांची हीच मोठी अडचण दूर करण्यासाठी आता केंद्र सरकार खाद्यतेलाच्या पॅकेजिंगबाबत एक मोठा आणि कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Department of Consumer Affairs) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी विशिष्ट आणि मानक आकार (Standard Size) निश्चित केले जाऊ शकतात. हा नवीन बदल ‘लीगल मेट्रोलॉजी’ म्हणजेच वैधानिक मापनशास्त्राच्या नियमांतर्गत केला जाणार आहे.

Edible Oil Standard Size : नवे नियम लागू झाल्यावर कसे असतील पॅकेट्स?

सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन नियमांनुसार, खाद्यतेल कंपन्यांना आता त्यांच्या मनमानी वजनाचे पाकीट तयार करता येणार नाही. नवीन नियम लागू झाल्यानंतर बाजारात खाद्यतेलाचे पॅकेट्स केवळ खालील ठराविक आकारातच उपलब्ध होतील:

200 मिली (ml) आणि 500 मिली (ml)

1 लीटर ते 5 लीटर

15 लीटर किंवा 15 किलो

20 लीटर किंवा 20 किलो

या निश्चित केलेल्या वजनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वजनात तेल विकण्यास बंदी घातली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Oil Industry Meeting : उद्योग संघटनांकडून चिंता व्यक्त

नुकतंच ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील खाद्यतेल उद्योगाशी संबंधित मोठ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. या बैठकीत उद्योग संघटनांनीही बाजारात पाकिटांच्या वाढत्या आणि वेगवेगळ्या आकारांबद्दल (Odd Sizes) चिंता व्यक्त केली. सर्व ब्रँड्सचे पॅकिंग एकाच मानक आकारात असल्यास ग्राहकांना तेलाची अचूक किंमत समजणे आणि विविध ब्रँड्समधील फरक ओळखणे सोपं होईल, यावर सर्वांचे एकमत झालं आहे.

Sachet Pack Exemption : छोटे पाकिटे सध्या या नियमातून राहणार बाहेर

बैठकीत चर्चा करताना उद्योग संघटनांनी सरकारला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. त्यानुसार, ग्रामीण भाग आणि गरीब ग्राहकांचा विचार करून 200 मिली (ml) पेक्षा कमी आकाराच्या छोट्या पाकिटांना (Sachets) या नियमाच्या कडक कक्षेतून तूर्तास बाहेर ठेवण्यात यावे, असं सूचवण्यात आलं आहे. यामुळे कमी किमतीत मिळणारे छोटे पाकिटे पूर्वीप्रमाणेच बाजारात उपलब्ध राहतील, जेणेकरून सर्वसामान्य ग्राहकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना कोणताही त्रास होणार नाही.

Consumer Protection India : ग्राहकांना काय फायदा होणार?

सध्या अनेक कंपन्या पाकिटाचे वजन थोडे कमी करून (उदा. 1 लीटर ऐवजी 910 ग्रॅम करून) कमी किमतीत तेल विकत असल्याचा आभास निर्माण करतात. सर्वसामान्य ग्राहकाला लिटर आणि ग्रॅममधील हा फरक लक्षात येत नाही आणि त्याची फसवणूक होते. मात्र, सरकारने एकदा का हे मानक आकार सक्तीचे केले की, सर्व कंपन्यांना एकाच वजनात तेल विकावे लागेल. यामुळे ग्राहकांना थेट एमआरपी (MRP) पाहून कोणता ब्रँड स्वस्त आणि चांगला आहे, याची थेट तुलना करता येईल आणि वजनाचा हा घोळ पूर्णपणे थांबेल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.