चर्चा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न
पाकिस्तानी पंतप्रधान सौदीच्या तर लष्करप्रमुख इराण दौऱ्यावर
संवाद…
- पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची सौदीच्या युवराजांसमवेत बैठक
- इराण दौऱ्यात आसिम मुनीर यांचा अराघची यांच्याशी संवाद
- लष्करप्रमुख आसिम मुनीर हे शिष्टमंडळासह तेहरानमध्ये दाखल
न्यूज एजन्सी/तेहरान, जेद्दा
पश्चिम आशियात तणाव वाढला असताना अमेरिका-इराण चर्चा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून तीव्र झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संवादाला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. जेद्दाह येथे सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान बुधवारी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सौदी अरेबियात दाखल झाले. दुसरीकडे, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर इराणमध्ये पोहोचले असून तेथून ते अमेरिकेलाही जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये सौदीच्या युवराजांना भेटणे हा एक सन्मान आणि आनंद असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी सौदी अरेबियासोबत पाकिस्तानची एकजूट व्यक्त केली. तसेच सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत संयम व धैर्य दाखवल्याबद्दल युवराजांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.
शरीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तानच्या अलीकडील राजनैतिक प्रयत्नांचाही उल्लेख केला. पाकिस्तानच्या प्रयत्नांमुळे अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी घडवून आणण्यात आणि इस्लामाबादमध्ये ऐतिहासिक शांतता चर्चेला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा करण्यात भूमिका बजावल्याचे ते म्हणाले. अमेरिका आणि इराण यांच्यात चिरस्थायी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तान कराराच्या दिशेने आपले प्रयत्न सुरूच ठेवेल, असेही शरीफ यांनी स्पष्ट केले आहे.
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल
दरम्यान, पाकिस्तानने समांतरपणे आणखी एक राजनैतिक पाऊल उचलले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर हेदेखील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह तेहरानमध्ये दाखल झाले. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी तेहरानमध्ये आगमन झाल्यावर शिष्टमंडळाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील थांबलेल्या चर्चेला पुन्हा चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. पाकिस्तानने या संवादाचे आयोजन करणे हे दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध दर्शवते. या प्रदेशात शांतता व स्थिरता वाढवण्याच्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेला बळकट करते.
Comments are closed.