भारत आणि नेपाळ यांच्यात आठ करार
बालेन शाह यांच्या दौऱ्यात 15 हजार कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याचे पॅकेजही घोषित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळचे नेते बलेंद्र शाह (बालेन शाह) यांच्या भारत दौऱ्याला प्रारंभ झाला असून रविवारी रात्री उशीरा त्यांचे भारतात आगमन झाले आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 8 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतातील अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर अशा रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला. नेपाळ हा भारताचा विश्वासार्ह आणि बळकट भागीदार आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, तर भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध हिमालयाएवढे बळकट आणि व्यापक आहेत, असे प्रतिपादन शाह यांनी केले. दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदन सादर केले आणि संयुक्त पत्रकार परिषदेचा कार्यक्रमही झाला.
भारताने नेपाळसाठी 15 हजार कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याचे पॅकेजही घोषित केले आहे. जलविद्युत प्रकल्प, मार्गनिर्माण कार्य, सांस्कृतिक आदानप्रदान आणि व्यापार तसेच गुंतवणूक या सर्व क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये भविष्यकाळात सहकार्य अधिक दृढ करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या ‘जॉईंट व्हिजन’ कार्यक्रम घोषित केला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत दोन्ही देश परस्परांमधील भक्कम संबंध भविष्यकाळापर्यंत पोहचविणार आहेत.
सरयू-कमला एक्सप्रेस
भारतातील अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर अशा ‘सरयू-कमला एक्स्पे्रस’चा प्रारंभ दोन्ही नेत्यांनी केला. रामायणकाळात प्रभू रामचंद्र आणि राजा जनक यांची कन्या सीता यांचा विवाह झालेला होता. सीतेचे मूळ स्थान सध्याच्या नेपाळमधील जनकपूर असल्याचे मानले जाते. त्यामुळे या रेल्वेमुळे दोन्ही देशांमधील प्राचीन सांस्कृतिक संबंधही अधिक दृढ होतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. ही नवी एक्स्पे्रस प्रारंभी प्रतिसप्ताह एकदा सीमापारचा प्रवास करणार आहे.
भारताचा प्रथमच दौरा
नेपाळचे नेते बलेंद्र शाह (ज्यांना त्यांच्या देशात बालेन शाह म्हणून ओळखले जाते) यांचा हा प्रथम भारत दौरा आहे. 36 वर्षे वयाचे शाह 2025 मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून नेपाळचे नेते बनले आहेत. त्याआधी नेपाळमध्ये तरुणांनी तेथील प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात उठाव करून त्यांना राजकारणातून दूर केले होते. नंतर तेथे अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली होती. 2025 मध्ये तेथे सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली आणि शाह यांनी बहुमत मिळविले.
ऊर्जा सहकार्य महत्त्वाचे
नेपाळ हे हिमालयातील राष्ट्र असल्याने तेथे जलविद्युत प्रकल्प मोठ्या प्रमाणावर स्थापन केले जाऊ शकतात. भारत आणि नेपाळ यांची सीमारेषा लागून असल्याने, तसेच सीमापार करणे सहज शक्य असल्याने भारत नेपाळला जलविद्युप प्रकल्प स्थापन करण्यासाठी सुलभरित्या साहाय्य करू शकतो. असे अनेक प्रकल्प सध्या कार्यरत आहेत. तसेच भविष्यातही नव्या प्रकल्पांचे निर्माण कार्य केले जाणार आहे. नेपाळमध्ये निर्माण झालेली वीज भारत विकत घेऊ शकतो. जलविद्युत ही पर्यावरणस्नेही असल्याने तिच्या उत्पादनाला दोन्ही देश मोठे प्राधान्य देत आहेत.
गंगाजल, रुद्राक्षमाला आणि चंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बलेंद्र शाह एकमेकांना कोणत्या भेटवस्तू देणार, या संबंधीही बरीच उत्सुकता या दौऱ्याच्या प्रसंगी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाह यांना पवित्र त्रिवेणी गंगाजलाचा कलश भेट म्हणून दिला. तर शाह यांनी त्यांना पशुपतीनाथ मंदिरातील चंदन आणि रुद्राक्षमाला भेट म्हणून दिली. नेपाळमधील शाळीग्रामही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. या भेटवस्तूंमुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिकच दृढ झाले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून या भेटवस्तू राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत.
कोणते महत्त्वाचे करार…
- सुरक्षा आणि कायदा कार्यान्वयन- भारताच्या सुरक्षा संस्था, सुरक्षा प्रशिक्षण संस्था आणि नेपाळच्या सुरक्षा संस्था यांच्यात संशोधन आणि विकास करार
- प्रशासन आणि नागरी सेवा- भारताचे राष्ट्रीय सुशासन केंद्र आणि नेपाळचे नागरी सेवा प्रशिक्षण महाविद्यालय यांच्यात महत्त्वाचा सामंजस्य, सहकार्य करार
- तंत्रज्ञान-कनेक्टिव्हिटी- इस्रो आणि नेपाळचा दूरसंचार विभाग यांच्यात करार. नगररचना आणि नगरविकास विभागांमध्ये विकास सहकार्याचा करार
- आरोग्य आणि कृषी- आयुर्वेद आणि पारंपरिक औषध पद्धती, कृषी तंत्रज्ञानाचे आदानप्रदान आणि आरोग्य विषयक व्यापक आदानप्रदान करार
Comments are closed.