कझाकिस्तानमधून खून प्रकरणातील आरोपींचे प्रत्यार्पण

इंटरपोलने जारी केली होती रेड कॉर्नर नोटीस

वृत्तसंस्था/ कोलकाता

सीबीआयने परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि हरियाणा पोलिसांच्या समन्वयाने एका खून प्रकरणातील ‘वॉन्टेड’ आरोपी आशिष कुमार याला कझाकस्तानमधून भारतात परत आणण्यात यश मिळवले आहे. इंटरपोलमार्फत जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे आरोपीला कझाकस्तानमधून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. तो सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर हरियाणा पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

हरियाणा पोलिसांनी नोंदवलेल्या एका खून प्रकरणात आशिष कुमार ‘वॉन्टेड’ होता. हत्येची ही घटना नोव्हेंबर 2025 मध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान घडली होती. सीबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सोहळ्यात मृत व्यक्ती आणि आरोपी यांच्यात वाद झाला. या वादानंतर संबंधित व्यक्ती आपल्या कारमधून घटनास्थळावरून निघत असताना आरोपीने आपल्या साथीदारांसह त्याचे वाहन थांबवून त्याच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. या हल्ल्यात झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

हरियाणा पोलिसांच्या विनंतीनुसार, सप्टेंबर 2026 मध्ये इंटरपोलमार्फत आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर, कझाकस्तानमधील अल्माटी येथील इमिग्रेशन विभागात त्याचे ठिकाण शोधण्यात आले. संबंधित संस्थांच्या समन्वयाने त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  2019 पासून इंटरपोलमार्फत 300 हून अधिक ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांना भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. यामध्ये 2026 मध्ये आतापर्यंत 75 फरार आरोपींचा समावेश आहे.

Comments are closed.