एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, Video व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर आरोप
कोल्हापूर : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात ते 40 लाख रुपये मागताना दिसून येतात. समोर बसलेल्या व्यापारी असलेल्या व्यक्तीशी त्यांचा हा संवाद असून पैशांच्या कथित देवाण-घेवाणीच्या विषय दिसून येतो. या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. तर, हा व्हिडिओ व्हायरल करण्यात काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej patil) यांचा हात असून महापालिका निवडणुकांवेळी देखील हा व्हिडिओ व्हायरल केल्याचं आमदारपुत्राने म्हटलं आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा हात आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी हाच व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती, असे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी म्हटले आहे. तसेच, मुळात रविकिरण इंगवले हा ब्लॅकमेलर आहे, असा आरोपही ऋतुराज यांनी पत्रातून केलाय.
चौकशी करावी – बंटी पाटील
राजेश क्षीरसागर यांचा 40 लाख रुपयांच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडिओ मीही पाहिला आहे. असा व्हिडिओ समोर येत असेल तर त्याची शहानिशा करून तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे.
एसआयटी नेमा, चौकशी करावी – संजय पवार
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हायरल व्हिडिओच्या चौकशीची मागणी केलीय. मुख्यमंत्र्यांनी SIT नेमून या व्हिडीओची चौकशी करावी, त्याचबरोबर क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करावी. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडिओची चौकशी करून इडी मार्फत त्यांना अटक करावी, अशी मागणीही संजय पवार यांनी केली आहे. व्हिडीओ क्लिपमध्ये नाव आलेल्या राहुल आणि प्रशांत यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करावी, असे संजय पवार यांनी पत्रात म्हटले.
देवाभाऊ, झिरो टोलरन्स धोरण अंगीकारा – वर्षा गायकवाड
दरम्यान, खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील या व्हिडिओवरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. देवाभाऊ, हा व्हिडीओ एकदा बघाच! हे आहेत तुमच्या मित्रपक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर! यापूर्वीही महायुतीच्या नेत्यांकडून अनेकदा खुलेआम अशाप्रकारे टक्केवारीची गणितं उघड झाली आहेत. हे बरोबर नाही.. याविरुद्ध ‘झिरो टोलरन्स’ धोरण अंगीकारा.. आणि या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीअंती कठोर कारवाई करा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केलीय.
हेही वाचा
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ
Comments are closed.