तटकरे-शिंदे शह-काटशहाचा नवा अंक; म्हसळ्यात अजित पवार गटाच्या फुटलेल्या सात नगरसेवकांना अपात्र करण्यास नगरविकासची स्थगिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजित पवार गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेल्या म्हसळा नगर परिषदेच्या सात नगरसेवकांना आज पात्र ठरवले. जिल्हाधिकाऱ्यांनी या नगरसेवकांना अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देऊन खासदार सुनील तटकरे यांना राजकीय धक्का दिला. शिंदे गटाचे भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांचा नेहमीच तटकरे यांच्याबरोबर कलगीतुरा रंगतो, पण आता या वादात एकनाथ शिंदे यांनीही उडी घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

म्हसळा नगर परिषदेच्या १७ जागांसाठी गेल्या साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत १३ जागा अजित पवार गटाला, दोन जागा काँग्रेसला आणि दोन जागा शिंदे गटाला मिळाल्या होत्या. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तटकरे यांचे सात नगरसेवक फोडून म्हसळ्याची सत्ता तटकरे यांच्याकडून हिसकावून घेतली होती. फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावे यासाठी तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी या सातही नगरसेवकांना अपात्र ठरवले. त्यानंतर शिंदे गटाला काही महिन्यात नगराध्यक्षपद सोडावे लागल्याने तटकरे यांच्या उपनगराध्यक्षाची प्रभारी नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती.

प्रभारी नगराध्यक्षांची मुदत संपली असून या पदासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्याच पाश्र्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुनावणी घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन या नगरसेवकांना अपात्र ठरवले होते. वास्तविक पाहता हे नगरसेवक त्यांच्या मूळ पक्षातून बाहेर पडलेले नाहीत, हे उघड झाल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, असे अॅड. सुशील पाटील यांनी सांगितले.

Comments are closed.