मुंबईत वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांकडून 2 तासांत छडा

मुंबई : गेल्याच महिन्यात अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसून आरोपीने सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरातून मुंबई पोलीस आणि मुंबईतील गुन्हेगारीची चर्चा सुरू झाली. मात्र, पोलिसांनी (Police) तत्परता दाखवत सैफ अली खान हल्लाप्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. मात्र, या भागातील अशा घटना अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील (Mumbai) वांद्रे परिसरातून आज आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्र्यात एका वृद्ध महिलेला तिच्याच घरात बांधून निर्घुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. रेखा खोंडे असे या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव असून मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत आज सकाळीच शेजाऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर, पोलिसांनी अवघ्या 2 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून चोरीच्या उद्देशाने शेजारीच राहणाऱ्या युवकाने महिलेचा गळा चिरुन खून केल्याची प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

महिलेच्या हत्येसंदर्भात प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलिस रिक्लेमेशन डेपो कांचन बिल्डिंग येथे पोहोचले. मारेकऱ्यांनी रेखा खोंडे यांचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. दरम्यान, पोलिसांनी रेखा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, या प्रकरणी वांद्रे पोलिसात हत्येचा गुन्हा देखील दाखल केला होता. महिलेला बांधून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून क्रूर पद्धतीने जीव घेण्यात आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात वृद्ध महिलेच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वांद्रे आरोपीला ताब्यात घेतले होते. शहरीफ अली समशेर शेख (27 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव असून तीन दिवसापूर्वी चोरीच्या उद्देशाने महिलेच्या घरात घुसून त्याने हात बांधून वृद्ध महिलेचा गळा कापल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

तीन दिवासांपूर्वीच झाली हत्या

आरोपीने चोरी करून घराचा दरवाजा बंद केला अन् तो परिसरातून फरार झाला होता. मात्र, तीन दिवसानंतर आज बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अवघ्या दोन तासात आरोपीला ताब्यात घेऊन चोरी गेलेला मुद्देमाल देखील वांद्रे पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे अटक आरोपी हा शेजारी राहणारा असून चोरीच्या उद्देशाने त्याने महिलाची केल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच, चोरीच्या उद्देशाशिवाय ही हत्या का केली गेली, काही वेगळं कारण आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा

स्वॉड आला रे… इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात

अधिक पाहा..

Comments are closed.