खरिपाचे कर्ज मिळालेच नाही, बळीराजांनी मंगळसूत्र गहाण ठेवून केली शेती, तहसीलदार, पोलीस ठाण्यात तक्रार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मोखाड्यात पीक कर्जमाफी होऊन तसेच कर्जभरणा करूनही खरीप हंगामात कर्ज न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. मोखाड्यात सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या माध्यमातून देण्यात येणारे पीक कर्ज खरीप हंगाम संपून रब्बी हंगाम सुरू झाला तरी शेतकऱ्यांना दिलेले नाही. आदिवासी शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या अपेक्षेने आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून शेती केली. त्यामुळे पीक कर्जाबाबत आपली फसवणूक झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

मोखाड्यातील पळसुंडा, मोखाडा, वाशाळा, पोशेरा, मोहाडा, शिंदेपाडा, खोडाळा, वाकडपाडा, आडोशी आणि आसेगाव या सहकारी संस्थांच्या सभासदांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खोडाळा शाखेकडून पीक कर्ज देण्यात येते. या दहा संस्थांचे तालुक्यात सुमारे साडेपाच हजारांहून अधिक सभासद आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जच मिळालेले नाही. आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. आमच्या सह्या, अंगठे घेण्यात आले. ३० सप्टेंबरच्या आत तुम्हाला पीक कर्ज मिळेल, असे आश्वासन सचिव विष्णू जोशी यांनी दिले. त्यामुळे आम्ही पत्नीचे मंगळसूत्र सोनाराकडे गहाण ठेवून शेती केली. मात्र आता रब्बी हंगाम सुरू झाला असून तुम्हाला कर्ज मिळणार नाही, असे सचिवाने सांगून आमची फसवणूक केल्याचे विठ्ठल धिंडे आणि रामू जाधव या आडोशी संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी सांगितले.

सचिवाने बनावट पावत्या दिल्या

खोडाळा संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी पीक कर्ज परतफेड केले. मात्र या शेतकऱ्यांना संस्थेच्या सचिवाने बनावट पावती पुस्तक छापून शेतकऱ्यांना कर्ज जमा केल्याच्या पावत्या दिल्याचा आरोप जोगलवाडीतील पांडुरंग सादरकर्ते या शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे सरकार दफ्तरी आम्ही थकीत कर्जदार राहिलो असून आम्हाला खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या वृत्तास खोडाळा संस्थेच्या चेअरमन गीता गवारी यांनी दुजोरा दिला असून तशी लेखी तक्रारही पोलीस ठाण्यात केल्याचे त्यांनी सांगितले.

Comments are closed.