FIFA WC26: हरलं तरी श्रीमंत! अमेरिकेला 152 कोटी, मात्र अर्धी रक्कम महिला संघासोबत शेअर करावी लागणार
फुटबॉल विश्वचषक अर्थातच फिफा विश्वचषक २०२६ ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ४८ संघासोबत सुरू झालेल्या या स्पर्धेतून ४० संघ बाहेर झाले आहेत. त्यामध्ये यजमान देश, अमेरिकेचाही समावेश आहे. स्पर्धेत आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत. अमेरिकेसाठी विश्वचषक संपला असून त्यांच्या राष्ट्रीय पुरुष संघाला १५२ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. खास म्हणजे, ही रक्कम अमेरिकेच्या महिला संघातील खेळाडूंमध्येही वितरित केली जाणार आहे.
फिफा विश्वचषकाच्या या २३ व्या आवृत्तीचे अमेरिकेसह मेक्सिको आणि कॅनडा यांनीही यजमानपद भुषविले. हे तिन्ही संघ ‘राऊंड ऑफ १६’ मध्ये पराभूत होत स्पर्धेबाहेर झाले. नियमानुसार, प्रत्येक सहभागी संघाला काही बक्षीस रक्कम मिळते. तसेच तिन्ही संघ ‘राऊंड ऑफ १६’ मध्ये पोहोचल्याने त्यांच्या बक्षीस रक्कममध्येही मोठी वाढ झाली आहे.
अमेरिकेला मिळणारी बक्षीस रक्कम जाहीर झाली असून कॅनडा आणि मेक्सिको यांना मिळणारी बक्षीस रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
अमेरिकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेला फिफाकडून एकूण १६ दशलक्ष डॉलर्स (१५२.८७ कोटी रुपये) मिळतील. ही रक्कम केवळ विश्वचषकात सहभागी झालेल्या २६ खेळाडूंनाच नाही तर अर्धी रक्कम महिला राष्ट्रीय संघामध्ये वाटली जाणार आहे.
सामान्यत: कोणत्याही खेळात सहभागी झालेल्या संघाला मिळालेली बक्षीस रक्कम खेळाडूंमध्येच वाटली जाते, मात्र अमेरिकेचा फुटबॉल संघ वेगळा आहे. येथे विश्वचषकातील बक्षीस रक्कम दोन्ही संघांमध्ये समान विभागली जाते, मग तो महिलांचा विश्वचषक असो वा पुरुषांचा विश्वचषक.
बक्षीस रक्कम वाटून घेण्यामागचे नेमके कारण
अमेरिकेच्या महिला संघाने अमेरिकन फुटबॉल संघटना असलेल्या ‘यूएस सॉकर’ विरुद्ध लढलेल्या कायदेशीर लढाईमुळे रक्कम वाटून घेण्याची परिस्थिती आहे. जवळपास सहा वर्षे महिला संघाने समान वेतनासाठी ‘यूएस सॉकर’ विरुद्ध कायदेशीर लढा दिला होता.
२०२२ मध्ये ‘यूएस सॉकर’ने पुरुष आणि महिला संघांसोबत बक्षीस वितरणावर एकमत केले. याच करारानुसार, विश्वचषकात जिंकलेली रक्कम पुढील विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघातील २६ खेळाडूंमध्ये विभागली जाते.
प्रत्येक खेळाडूला किती पैसे मिळणार?
संघातील प्रत्येक खेळाडूला किती रक्कम मिळणार याबद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये आणखी एक बाजू आहे. करारानुसार, बक्षीस रक्कमेच्या २० टक्के वाटा यूएस सॉकरला मिळतो आणि बाकी ८० टक्के खेळाडूंमध्ये विभागले जाते.
यामुळे १६ दशलक्ष डॉलर्सपैकी २० टक्के, म्हणजे ३.२ दशलक्ष डॉलर्स यूएस सॉकरला मिळतील. उर्वरित १२.८ दशलक्ष डॉलर्स संघांना मिळतीत. याचा अर्थ प्रत्येक खेळाडूच्या खात्यात २४६,२५३ डॉलर्स (२.३५ कोटी रुपये) जमा होतील.
Comments are closed.