फिफा वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच घडलं असं; ड्रॉ खेळूनही कॅनडाने रचला इतिहास!
फिफा विश्वचषक च्या आपल्या पहिल्याच सामन्यात यजमान कॅनडाला ड्रॉवर (सामना अनिर्णित सुटल्याने) समाधान मानावे लागले आहे. कॅनडा आणि बोस्निया-हर्झगोव्हिना यांच्यातील हा सामना १-१ असा ड्रॉ राहिला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात कनाडियन भूमीवर वर्ल्ड कपचा सामना खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे, यावेळच्या विश्वचषकाचे यजमानपद मेक्सिको, युएसए (अमेरिका) आणि कॅनडा संयुक्तपणे भूषवत आहेत.
जगातील ६३ व्या क्रमांकाच्या बोस्निया आणि हर्झगोव्हिना संघाने रँकिंगमध्ये आपल्यापेक्षा खूप वर असलेल्या कॅनडाला ड्रॉवर रोखण्यात यश मिळवले. सामन्यातील पहिला गोल बोस्नियाकडून आला, जेव्हा १९ व्या मिनिटाला जोवो लुकिच याने गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
पहिला गोल बोस्नियाने केला असला, तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामन्यावर कॅनडाच्या संघाचेच नियंत्रण होते. सामन्यात ६१ टक्के वेळ बॉल कॅनडाच्या खेळाडूंकडे होता, ज्यांनी १३ वेळा ‘डी’ (D-Box) मध्ये प्रवेश करत गोल करण्याचा प्रयत्न केला, तर बोस्नियाला केवळ ८ वेळाच असे करता आले.
विशेषतः दुसऱ्या हाफमध्ये बोस्निया आणि हर्झगोव्हिनाचा संघ बचावात्मक खेळताना दिसला, तर कॅनडाचा संघ सातत्याने आक्रमण करत राहिला. अखेर ७८ व्या मिनिटाला क्रिस्टोफर लारिन याने गोल करून कॅनडाला बरोबरी साधून दिली. सामना ड्रॉ झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. हा ग्रुप ‘बी’ चा सामना होता, ज्यामध्ये कॅनडा, बोस्निया आणि हर्झगोव्हिना, स्वित्झर्लंड आणि कतार हे संघ आहेत.
कॅनडा फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे. १९८६ मध्ये कॅनडाचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. त्यानंतर २०२२ मध्येही त्यांना ग्रुप स्टेजमधूनच बाहेर व्हावे लागले होते.
Comments are closed.