नेमबाज जसपाल राणा यांचे निधन.

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे महान नेमबाज जसपाल राणा यांचे शुक्रवार, 12 जून रोजी निधन झाले. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कलिकेश नारायण सिंह देव यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. 49 वर्षीय राणा यांची प्रकृती 1 जून रोजी जर्मनीहून परतताना विमानात खालावली होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात केल्यानंतर त्यांच्या हृदयात स्टेंट टाकण्यात आला. मात्र, त्यानंतरही त्यांची प्रकृती सावरू न शकल्याने अखेरीस शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शब्द सुमनांजली अर्पण केली आहे.

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते 49 वर्षीय जसपाल राणा यांनी भारतीय नेमबाजीला सध्याच्या स्तरावर पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एक सन्मानित खेळाडू म्हणून देशासाठी अनेक पदके जिंकल्यानंतर, त्यांनी भारतीय पिस्तूल नेमबाजांच्या नवीन पिढीला प्रशिक्षणही दिले. जसपाल राणा यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग चार स्पर्धांसह 9 सुवर्णपदके जिंकली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेत्या नेमबाज मनू भाकर यांचेही राणा प्रशिक्षक होते. फेब्रुवारी 2025 मध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारासाठी त्यांची भारतीय ज्युनियर संघाच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

जसपाल राणा यांनी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळून एकूण 23 पदके जिंकली होती. यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 8 पदकांचा समावेश होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 15 पदके जिंकली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

जसपाल राणांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली, परंतु 1994 च्या मिलान जागतिक नेमबाजी स्पर्धेतील त्याचा विजय अविस्मरणीय होता. स्पर्धेच्या एक दिवस आधी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असतानाही पदक प्राप्त केले होते. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला देतानाच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यास नकार दिला. डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावत, जसपाल आणि त्याचे प्रशिक्षक, सनी थॉमस यांनी स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्याच रात्री त्यांच्या वेदना अधिकच वाढल्या. ते आपली जीन्ससुद्धा काढू शकत नव्हते. अखेरीस त्यांनी आपली जीन्स फाडून तिची हाफ-पँट बनवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती घालूनच स्पर्धेत उतरले. असह्य वेदनांनी विव्हळत असताना राणा यांनी सामना खेळला आणि ज्युनियर गटात विश्वविक्रमी गुणांसह आपले पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. त्यावर्षी त्यांनी हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

Comments are closed.