हरियाणात काँग्रेसचे पाच आमदार निलंबित.

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्यांवर पक्षाची कारवाई

वृत्तसंस्था/चंदीगड

हरियाणा काँग्रेसने गुरुवारी राज्यसभेत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या पाच आमदारांवर मोठी कारवाई केली. काँग्रेसने नारायणगडच्या आमदार शैला चौधरी, साधौरीच्या आमदार रेणू बाला, रतियाचे आमदार सरदार जरनैल सिंग, पुन्हानाचे आमदार मोहम्मद इलियास आणि हाथिनचे आमदार मोहम्मद इस्रायल यांना गुरुवारी निलंबित केले. संघटनात्मक शिस्तीच्या उल्लंघनाची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाने हरियाणातील पाच आमदारांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून तात्काळ निलंबित केले आहे. हरियाणा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी गुरुवारी यासंबंधीची माहिती दिली. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल या पाच काँग्रेस आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य शिस्तपालन समितीच्या शिफारशीनंतर आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मंजुरीने ही कारवाई करण्यात आल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेत क्रॉस-व्होटिंग केल्याबद्दल कारवाई

कारवाई करण्यात आलेल्या आमदारांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करून गंभीर बेशिस्त दाखवली असून त्यांची ही कृती संघटनात्मक नियमांच्या विरुद्ध असल्याचे राव नरेंद्र सिंह यांनी सांगितले. पक्षात शिस्त महत्त्वाची असून कोणत्याही स्तरावरील बेशिस्त सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हा निर्णय सर्व नेते आणि कार्यकर्त्यांसाठी एक स्पष्ट संदेश आहे. यापुढेही पक्षाच्या सामूहिक निर्णयाच्या आणि अधिकृत भूमिकेच्या विरुद्ध कोणतीही कृती केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Comments are closed.