हेलिकॉप्टर अपघातातील पाच बळी कर्नाटकातील आहेत
मूळच्या अथणी तालुक्यातील पोलीस निरीक्षकाचाही समावेश
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत कर्नाटकातील पाच जण ठार झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. बेंगळूरमधील सीसीबीचे निरीक्षक अरुण साळुंके, वकील के. सुधीर, शंकरगौडा, एच. एस. नटराज आणि प्रताप यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यातील पोलीस निरीक्षक अरुण साळुंके हे मूळचे बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील अरटाळ गावचे आहेत. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे अरटाळ गावावर शोककळा पसरली आहे.
2007 च्या बॅचचे पोलीस अधिकारी अरुण साळुंके यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. ते बेंगळूरच्या राममूर्तीनगर येथे वास्तव्यास होते. बेंगळुरातील इंदिरा नगर, बाणसवाडीसह अनेक पोलीस स्थानकांत निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. ते काही महिन्यांपासून सीसीबीच्या विशेष तपास विभागात कार्यरत होते. बाणसवाडी येथे पोलीस निरीक्षक असताना लोकांच्या उत्तम प्रतिसादाच्या आधारे बेंगळूर पोलीस लोकस्पंदन प्रक्रियेअंतर्गत या पोलीस स्थानकाला सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानक म्हणून गौरविण्यात आले होते. अरुण यांनी एम. एस. रामय्या तांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेतले होते.
त्याचप्रमाणे अपघातात मृत्यू झालेले नटराज आणि शंकरगौडा हे तुमकूर जिल्ह्याच्या कुणिगल तालुक्यातील हुलियुरदुर्ग येथील रहिवासी आहेत. तसेच प्रताप गौडा हे हासन जिल्ह्याच्या सकलेशपूर तालुक्यातील बाचळ्ळी येथील असून बेंगळुरात उद्योग सांभाळत होते.
Comments are closed.