204 धावांच्या वादळी खेळीसह वैभवचा महारेकॉर्ड! क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच एका फलंदाजाने ठोकले 'इतके' षटकार

आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत आज म्हणजेच (24 नोव्हेंबर) रोजी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) फलंदाजीने कतारची राजधानी दोहा येथे धुमाकूळ घातला. यूएईविरुद्ध एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत त्याने सर्वात वेगवान द्विशतक झळकावत इतिहास रचला. या ऐतिहासिक खेळीदरम्यान त्याने असा विश्वविक्रम केला आहे, जो मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसेल. वैभवने एकाच सामन्यात 28 षटकार लगावत क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधील एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारत अ संघाचा सलामीवीर (Team India A Opener) वैभवने 24 नोव्हेंबर रोजी यूएईविरुद्ध स्पर्धेतील 11व्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने अवघ्या 53 चेंडूंत 204 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 28 षटकार आणि 7 चौकार ठोकले. म्हणजेच त्याने आपल्या एकूण 204 धावांपैकी 196 धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. त्याच्या या फलंदाजीसमोर यूएईचे गोलंदाज पूर्णपणे हतबल ठरले.

वैभवच्या आधी एका स्पर्धात्मक क्रिकेट सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डार्सी शॉर्टच्या नावावर होता. त्याने 2018 मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना क्वीन्सलँडविरुद्ध 23 षटकार लगावले होते. मात्र, वैभवने 28 षटकार मारत 8 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. विशेष म्हणजे, हा विक्रम केवळ लिस्ट-ए क्रिकेटपुरता (List A Cricket) मर्यादित नाही. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आणि वयोगटातील स्पर्धात्मक सामन्यात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने एका खेळीत इतके षटकार मारले नव्हते.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

28 | वैभव सूर्यवंशी (भारत)
23 | डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया)
21 | बेवन जेकब्स (न्यूझीलंड)
17 | गेरहार्ड स्नायमन (दक्षिण आफ्रिका)
17 | इयॉन मॉर्गन (इंग्लंड)

या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर वैभवने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 800 धावांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 16 लिस्ट-ए सामन्यांत त्याने 805 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 (Asia Cup Rising Star 2026) स्पर्धेत वैभव 1000 धावांचा मोठा टप्पा गाठू शकतो.

Comments are closed.