केरळच्या माजी डीजीपीला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

30 लाख रुपयांचा दंड : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात निकाल

वृत्तसंस्था/कोट्टायम

केरळचे माजी डीजीपी टॉमिन जे. थाचनकरी यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोट्टायम दक्षता न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. रजनीश यांनी गुरुवारी त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने सदर माजी आयपीएस अधिकाऱ्याला 30.84 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. केरळमध्ये अवाजवी मालमत्ता बाळगल्याबद्दल डीजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे. या प्रकरणाचा तपास एर्नाकुलम येथील दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी ब्युरोच्या  विशेष पथकाने केला होता. 2003 ते 2007 दरम्यान थाचनकरी यांची मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 135.80 टक्के जास्त असल्याचे तपासात उघड झाले. तपास यंत्रणेनुसार या कालावधीत अंदाजे 64.70 लाख इतका खर्च आढळून आला असून हे थाचनकरींना त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांशी ताळमेळ घालता आला नाही. खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने 96 साक्षीदार आणि 271 कागदपत्रे सादर केली. बचाव पक्षाने 23 साक्षीदार आणि 55 कागदपत्रे सादर केली.

Comments are closed.