दिल्लीत इमारत कोसळून चौघांचा मृत्यू.

10 जखमींना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल, तिघांची प्रकृती गंभीर; 12 जणांना वाचवण्यात यश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या साकेत परिसरात शनिवारी रात्री पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. दहा जखमींना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. मदत व बचावकार्यादरम्यान 12 जणांना वाचविण्यात यश आल्याचे दक्षिण दिल्ली जिल्हा डीसीपी अनंत मित्तल यांनी सांगितले. जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आल्यामुळे आपद्ग्रस्तांना तातडीने उपचार मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

साकेत मेट्रो स्टेशनजवळ असलेली ही इमारत शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यानंतर यासंबंधीची माहिती आपत्कालीन पथकाला दिल्यानंतर पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी बचावकार्य सुरू केले. बहुमजली इमारत कोसळलेल्या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे कॅन्टीन होते. रविवारी दिवसभर विविध यंत्रणांकडून बचावकार्य राबविण्यात आले. अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती आहे. पोलीस आणि बचाव पथकांनी अंदाजे 12 जणांना वाचवले आहे. जखमींना रुग्णालयात त्वरित पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले होते. एनडीआरएफ, डीडीएमए, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस यांनी संयुक्तपणे मदत आणि बचावकार्यात मोलाची भूमिका पार पाडली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट घेत अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात भेट देत जखमींचीही विचारपूस केली.

Comments are closed.