“झोपताना तू सुंदर दिसतेस…” विमानामध्ये झोपलेल्या महिला प्रवाशाचा विनयभंग,आरोपीला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विमान प्रवासातील सुरक्षेला आणि सभ्यतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाने झुरिच ते मियामी असा प्रवास करणाऱ्या एका 48 वर्षीय फ्रेंच नागरिकाने महिला सहप्रवाशाचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुइलॉम सेबॅस्टिन रॉजर मॅटलर असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 एप्रिल रोजी फ्लाईट LX64 मध्ये घडली असून सध्या या प्रकरणाची तक्रार फ्लोरिडाच्या दक्षिण जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॅटलर आणि 29 वर्षीय पीडित महिला विमानाच्या फर्स्ट क्लास केबिनमध्ये एकमेकांच्या शेजारी बसले होते. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. प्रवासादरम्यान पीडित महिला झोपलेली असताना मॅटलरने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. ही बाब जवळच बसलेल्या इतर दोन प्रवाशांच्या लक्षात आली. त्यापैकी एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तातडीने विमान कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. एफबीआयच्या विशेष एजंटने तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपीने पीडितेच्या कपड्यांच्या आत हात टाकण्याचा प्रयत्न केला.

विमान कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहिले तेव्हा त्यांना मॅटलरचा हात पीडितेच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसला. त्यानंतर त्याला तातडीने पीडितेपासून दूर करून दुसऱ्या विभागात हलवण्यात आले. पीडित महिला झोपेतून जागी झाल्यानंतर तिला घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली, तेव्हा तिला मोठा धक्का बसला आणि ती रडू लागली. यानंतरही मॅटलरने तिला एक चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला, ज्यावर “तू झोपलेली असताना खूप सुंदर दिसतेस” असे लिहिले होते.

सुरुवातीला मॅटलरने सर्व आरोप फेटाळून लावले होते, मात्र जेव्हा त्याला व्हिडिओ पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब दाखवण्यात आले, तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. मला ही गोष्ट इतकी मोठी वाटली नव्हती. माझा उद्देश केवळ तिचा फोन नंबर मिळवणे हा होता. म्हणून मी स्वतःच्या बिझनेस कार्डवर ही चिठ्ठी लिहून तिला देण्याचा प्रयत्न केला होता, असे आरोपीने सांगितले. आरोपी मॅटलर सध्या मियामी येथील फेडरल डिटेंशन सेंटरमध्ये कोठडीत आहे.

Comments are closed.