नवी मुंबई पालिकेने मागणी केलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव; सिडकोतील अधिकारी, दलालांची टोळी सक्रिय झाल्याचा गणेश नाईकांचा आरोप
सुविधांसाठी नवी मुंबई महापालिकेने मागणी केलेले भूखंड खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. सिडकोतील काही अधिकारी आणि दलालांची टोळी बिल्डरांना भूखंडांची माहिती पुरवून त्यांच्या पसंतीचे भूखंड मिळवून देण्यासाठी सक्रिय झाली आहे, असा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी केला. दरम्यान नवी मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. नागरिकांच्या हिताशी खेळ करणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी आयोजित जनता दरबारात नाईक यांनी सिडकोच्या कारभारावर निशाणा साधला. नवी मुंबई महापालिकेला शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक भूखंड देण्याची मागणी नगरविकास विभागाचे अधिकारी असितकुमार आणि नगरविकास सचिव गोविंदराज यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे. यासाठी महासभेतही लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. विविध लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी सुचविलेल्या भूखंडांची यादीही तयार करण्यात आली आहे. मात्र ही यादी तयार होताच सिडकोतील दलाल सक्रिय झाले आहेत. सार्वजनिक वापराचे भूखंड ते बिल्डरांच्या घशात ब्त घालण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत, असे नाईक यावेळी म्हणाले.
दोन दिवसांत सिडकोतील घिरट्या वाढणार
सिडकोतील दलाल बिल्डरांना उपलब्ध भूखंडांची माहिती देत असून त्यांना कोणते भूखंड हवे आहेत याची विचारणा करत आहेत. येत्या दोन तीन दिवसांत सिडकोच्या विपणन आणि नियोजन विभागात बिल्डरांचे दलाल मोठ्या प्रमाणावर घिरट्या घालणार आहेत. या प्रक्रियेत सिडकोतील काही अधिकारीही बिल्डरांना मदत करत करीत आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.
Comments are closed.