गिरीश महाजनांनी केवळ दिलगिरी व्यक्त करू नये, तर…; महिला कर्मचारी माधवी जाधवांची एकच मागणी
नाशिक : राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी नाशिक (nashik) जिल्हाधिकारी कार्यलायात ध्वजवंदन केले. येथील कार्यक्रमात भाषण करताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. त्यावरुन, चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत असून वन विभागाच्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असून अनावधानाने माझ्याकडून नाव घेण्याचं राहिलं. तसेच, मी बाबासाहेबांच्या प्रत्येक जयंती स्वत:हून सहभागी असतो, नाव न घेण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, असेही सांगितले. मात्र, महाजन यांनी केवळ दिलगिरी व्यक्त न करता, जाहीर लेखी माफी मागावी, अशी मागणी आता माधवी जाधव यांनी केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीगिरी व्यक्त केलीय, पण त्यांनी जाहीर लेखी माफी मागावी अशी मागणी वन विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी माधवी जाधव यांनी केली आहे. गिरीश महाजन यांचे सुदैव आणि माझे दुर्दैव हे प्रकरण ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत बसत नाही. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी हे जाणून बुजून केले आहे. कारण, आपल्या भाषणात त्यांनी इतर महापुरुषांची नावे घेतली, छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या ह्रदयात आहेत, छत्रपती संभाजी महाराज यांचेही त्यांनी नाव घेतले. मात्र, बाबासाहेबांचे नाव त्यांनी घेतले नाही, असा आरोप माधवी जाधव यांनी केला आहे. तसेच, गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त न करता लेखी माफी मागावी, त्यात आंबेडकर अनुयायी नागरिकांची माफी मागावी, असेही माधवी जाधव यांनी म्हटले. जोपर्यंत गिरीश महाजन माफी मागत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
नाकाला घाम फुटला, विषय नाही : संजय राऊत
दरम्यान, गिरीश महाजन यांच्याकडून झालेल्या चुकीबाबात खासदार संजय राऊत यांनीही भूमिका मांडली. महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळाले. भारत प्रजासत्ताक झाला, अशा वेळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे हे सत्य आहे. त्या महिलेचा देखील सन्मान व्हायला हवा. त्यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचे देखील कौतुक करतो. पण, आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नये, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.