गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात, ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा येथे ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील सहा जणांचा मृत्यू, तर 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातातील सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कामानिमित्त हैदराबादकडे निघालेल्या मजुरांच्या पिकअप वाहनाला नागरा परिसरात रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.

गोंदिया-बालाघाट मार्गावर भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, हे सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असून रोजगाराच्या कामासाठी हैदराबादकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.