आयात आणि निर्यातीबाबत देशासाठी 'गुड न्यूज'.
निर्यात 43.81 अब्ज डॉलर्स, व्यापारी तुटीत घट
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक आघाडीवर भारत मोठी प्रगती करत आहे. आयात-निर्यातीसंबंधीच्या नव्या आकडेवारीवरुन ही बाब स्पष्ट होत आहे. ऑगस्ट 2026 मध्ये भारताच्या निर्यातीत 26.12 टक्के वाढ झाली असून निर्यात 43.81 अब्ज डॉलर्सपर्यंत (साधारणत: 4 हजार 192 अब्ज रुपये) पोहचली आहे. तसेच भारताच्या व्यापारी तुटीतही घट होऊन आता ती 27.2 अब्ज डॉलर्स इतकी राहिली आहे. सध्याच्या आव्हानात्मक जागतिक आर्थिक परिस्थिती ही प्रगती समाधानकारक असून भारताचा आर्थिक पाया बळकट असल्याचे हे चिन्ह असल्याची प्रतिक्रिया आहे.
ऑगस्टमध्ये भारताची आयातही वाढली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये ती 61.96 अब्ज डॉलर्स इतकी होती. ती आता 70.76 अब्ज डॉलर्स आहे. ही वाढ 14.1 टक्के आहे. याचा अर्थ असा की भारताच्या निर्यातीत झालेली वाढ आयातीत झालेल्या वाढीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे व्यापारी तूट ऑगस्टमध्ये कमी झाली आहे. व्यापार विभागाचे प्रमुख सचिव राजेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
निर्यातीत वाढ कशासाठी…
ऑगस्टमध्ये निर्यातीत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अभियांत्रिकी उत्पादने, रासायनिक पदार्थ, पेट्रोलियम उत्पादने, वस्त्रप्रावरणे आणि उत्पादित वस्तू यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. भारताच्या या क्षेत्रांमधील उत्पादनांना जगाच्या बाजारात मागणी वाढल्याने निर्यातीत वाढ झाली. अमेरिका, युरोपियन महासंघ, ब्रिक्स देश आणि अन्य विकसनशील देश यांच्या बाजारपेठेत भारतीय मालाची मागणी वाढताना दिसून येत आहे. या प्रगतीसाठी केंद्र सरकारचे व्यापारानुकूल धोरण आणि उत्पादनांची गुणवत्ता कारणीभूत असल्याचे दिसत आहे.
व्यापारी तूट म्हणजे काय…
ज्यावेळी निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाण अधिक होते, तेव्हा व्यापारी तूट निर्माण होते. भारताची एकंदर व्यापारी तूट मोठी आहे. तथापि, ऑगस्टमध्ये ती कमी झाल्याचे दिसून आले. कारण, ऑगस्ट 2025 मध्ये भारताची निर्यात जितकी होती, तिच्यापेक्षा या ऑगस्टमध्ये निर्यात जवळपास 22 टक्के वाढली आहे. मात्र, त्याचवेळी आयात वाढली असली, तरी ती त्या प्रमाणात वाढलेली नाही. निर्यातवाढीचे प्रमाण आयातवाढीपेक्षा अधिक असल्याने व्यापारी तूट कमी झाली.
सोन्याची घटली आयात
ऑगस्ट 2026 मध्ये सोन्याची आयात घटली आहे. मागच्या ऑगस्टमध्ये ती 5.4 अब्ज डॉलर होती. या ऑगस्टमध्ये ती 2.3 अब्ज डॉलर्स झाली आहे. ही आयात घट 57.7 टक्के आहे. सोन्याची आयात कमी झाल्याने भारताची व्यापारी तूट कमी होण्यास हातभार लागला आहे. अत्यावश्यक असेल, तरच सोने खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलेले आहे. या आवाहनाला सर्वसामान्य नागरीक प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. सोन्याची खरेदी घटल्याने त्याची आयातही कमी झाली, अशी माहिती देण्यात आली आहे.
सर्वसामान्य माणसावर काय परिणाम…
व्यापारी तूट घटणे हे देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे लक्षण आहे. तसेच निर्यात वाढ झाल्याने उत्पादन वाढते. त्यामुळे नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यताही वाढते. देशावरचे व्यापारी तुटीचे ओझे कमी झाल्यास देशाची आर्थिक पत आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वाढते. त्यामुळे अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास साहाय्य मिळते. ऑगस्ट महिन्यातील हा व्यापारी तूट घटण्याचा कल पुढच्या काही महिन्यांमध्ये असाच राहिला आणि व्यापारी तूट आणखी कमी झाली, तर भारताचे चलन असणाऱ्या रुपयाचीही किंमत वाढणार आहे. तसेच, भारतात अधिक प्रमाणात विदेशी गुंतवणूक येण्यासही ही स्थिती कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
तूट घटल्याने लाभ
ड व्यापारी तूट घटणे हे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे प्रमुख लक्षण
ड आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय स्थितीतही भारताची आर्थिक प्रगती लक्षणीय
ड पंतप्रधान मोदी यांच्या सोने खरेदी कमी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद
ड सोन्याची आयात घटल्याने व्यापारी तूट कमी होण्यास लागला हातभार
Comments are closed.