भारतीय महिला संघासाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिक 2028मध्ये मिळाली थेट एन्ट्री

महिला टी-२० विश्वचषक २०२६च्या साखळी टप्प्यातून भारतीय संघाला बाहेर पडावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या करो या मरो सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्कारावा लागला होता. या घटनेनंतर आता टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताच्या महिला संघाने २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवल्याची अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे. अनेक दशकांनंतर आगामी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) यांनी सोमवारी २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या ऐतिहासिक पुनरागमनासाठी पात्रता प्रक्रियेची अधिकृत घोषणा केली. तब्बल अनेक दशकांनंतर क्रिकेटचं ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होणार असून, या स्पर्धेपूर्वी प्रथमच ICC ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा (Olympics Qualifier) आयोजित केली जाणार आहे.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही टी-२० स्पर्धांमध्ये प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील. या स्पर्धेत आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनिया या चारही खंडांतील किमान एका संघाला स्थान निश्चित करण्यात आलं आहे, त्यामुळे प्रत्येक खंडाचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळणार आहे.

पुरुष आणि महिला गटातील प्रत्येकी पाच संघांची निवड विद्यमान आयसीसी स्पर्धांमधील कामगिरी आणि आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या आधारे केली जाणार आहे. ही प्रक्रिया आयसीसीच्या अधिकृत फ्युचर टूर प्रोग्राम (FTP)नुसार पार पडेल. तर पुरुष आणि महिला गटातील सहावा व अखेरचा संघ 2027मध्ये प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या आयसीसी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या (ICC Olympics Qualifier) माध्यमातून निश्चित केला जाईल.

दरम्यान, 2026 च्या महिला टी20 विश्वचषकातून लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठीचे पहिले चार संघ निश्चित झाले आहेत. आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनिया या प्रत्येक खंडातून सर्वोच्च स्थान मिळवणारे पात्र संघ म्हणून दक्षिण आफ्रिका, भारत, ग्रेट ब्रिटन (इंग्लंडमार्फत) आणि ऑस्ट्रेलिया यांनी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. प्रत्येक खंडातून केवळ एका संघालाच थेट पात्रता देण्यात आली आहे.

अमेरिका हा 2028 ऑलिम्पिकसाठी यजमान देश असल्याने पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये त्यांना थेट पात्रतेची संधी असेल. मात्र, त्यासाठी 30 जून 2026 ते 31 डिसेंबर 2026 या पात्रता कालावधीत संबंधित आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अमेरिकेचा संघ किमान अव्वल-15 मध्ये असणं आवश्यक आहे. जर अमेरिकेचा महिला संघ ही अट पूर्ण करू शकला नाही, तर 1 मार्च 2027 रोजीच्या आयसीसी टी20 क्रमवारीनुसार अद्याप पात्र न ठरलेल्या कोणत्याही खंडातील सर्वोच्च क्रमांकाच्या संघाला पाचवं थेट स्थान दिलं जाईल.

पुरुष गटातही अमेरिकेचा संघ 31 डिसेंबर 2026 पर्यंत अव्वल-15 मध्ये नसल्यास, अद्याप पात्र न ठरलेल्या सर्वाधिक मानांकित संघाला हे स्थान मिळेल. आयसीसीने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, पुरुष गटातील उर्वरित पात्रता स्थानांचा निर्णय 31 डिसेंबर 2026 रोजीच्या आयसीसी टी20 क्रमवारीनुसार घेतला जाईल. आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनिया या खंडांतील सर्वाधिक क्रमांकाच्या पात्र संघांना लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

Comments are closed.